मालोजीराजे महापौरांसोबत येणार एकाच व्यासपीठावर
By Admin | Updated: March 13, 2015 23:57 IST2015-03-13T23:51:49+5:302015-03-13T23:57:23+5:30
अंतर्गत राजकारणाला उफाळी : सभागृहातही पाठिंबा लाभणार

मालोजीराजे महापौरांसोबत येणार एकाच व्यासपीठावर
कोल्हापूर : रमणमळा येथील जलतरण तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १६) होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर तृप्ती माळवी भूषविणार आहेत. महापौर बहिष्कारप्रकरणानंतर मालोजीराजे गटाचे नगरसेवक थेटपणे महापौरांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले हाते. आता थेट राजेच महापौरांसमवेत एकाच व्यासपीठावर येणार असल्याने महापालिकेतील अंतर्गत राजकारणास उफाळी आली आहे.
महापालिकेच्या सत्ताधारी आघाडीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लाचप्रकरणात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यातून महापौरांविरोधात सभागृह व सभागृहाबाहेर असहकार्याची घोषणाही नगरसेवकांनी केली आहे. शहरातील रस्त्यांचे उद्घाटन असो किंवा आरोग्य शिबिर, शोकसभा असो किंवा जयंतीचा कार्यक्रम महापौर व नगरसेवक यांनी दोन-दोनवेळा एका ठिकाणी, एकाच दिवशी उद्घाटनाचे कार्यक्रम केले. महापौर व नगरसेवकांतील दरी वाढत असतानाच नगरसेवक सत्यजित कदम यांनी सत्ताधारी आघाडीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली.
सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांची उपस्थिती वाढत असतानाच त्यास मालोजीराजे गटाचे पाठबळ मिळू लागले. महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या संभाजीनगरातील रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास राजे गटाच्या सर्व नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविली. त्यानंतर मालोजीराजे पुण्यात असल्याने चार दिवसांत भूमिका स्पष्ट करतील, असा खुलासा करण्यात आला होता. मात्र, आता मालोजीराजे महापौरांसह एका व्यासपीठावर येत असल्याने त्यांची भूमिका आपोआपच स्पष्ट होत असल्याची चर्चा महापालिकेत आहे.. त्यामुळे आतापर्यंत महापौरांना सभागृहाबाहेर मालोजीराजे गटाचा असणारा पाठिंबा सभागृहातही मिळण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)
महापौरांना आमदार महादेवराव महाडिक यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा उघड पाठिंबा आहे. मालोजीराजे महापौरांसह जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने राजे गटास महापौरांचे वावडे नाही, आपसूकच हा संदेश जाणार आहे. त्यानंतर मात्र, तळ्यात-मळ्यात असणारे दहा-बारा नगरसेवक उघडपणे महापौरांच्या छावणीत दाखल होण्याची चिन्हे आहेत.