नियोजनाअभावी मलकापूर एस. टी. आगाराची चाके खोलातच
By Admin | Updated: November 27, 2014 00:15 IST2014-11-26T23:41:31+5:302014-11-27T00:15:36+5:30
आर्थिक गणित काही जुळेना : गाड्यांची कमतरता, वाहक-चालकांची पदे रिक्त

नियोजनाअभावी मलकापूर एस. टी. आगाराची चाके खोलातच
राजाराम कांबळे - मलकापूर -मलकापूर एस. टी. आगारात नियोजनाचा अभाव, समांतर धावणाऱ्या गाड्या, मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक याबरोबरच आगारात गाड्यांची कमतरता व चालक व वाहक यांची रिक्त पदे यामुळे या आगाराचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम भागात असणाऱ्या एस. टी. डेपोला उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी होत आहे.
शाहूवाडी तालुक्यात माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने मलकापूर एस.टी. आगार चालू झाला. पहिले दहा ते पंधरा वर्षे हा एस.टी. डेपो नसल्यात होता. कालांतराने महाराष्ट्रातील संपूर्ण एस.टी.चा डोलारा हळूहळू कोसळत गेला. यामध्ये मलकापूर आगाराला खासगी वाहतुकीचा सर्वांत मोठा फटका बसला व डेपो तोट्यात चालू लागला.
शाहूवाडी तालुक्यात १३१ गावे २५० वाड्यावस्त्यांतून तालुका विभागाला आहे. कच्चे रस्ते यामुळे एस.टी.ला अनेक प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. मलकापूर आगाराकडे सध्या ५९ गाड्यांची आवश्यकता आहे. मात्र नऊ ते दहा या जुन्या गाड्यांवर येथील कारभार सुरू आहे.
येथे २२ चालकांची कमतरता आहे. मात्र ड्युटीवर असणाऱ्या चालकांवर ताण पडत आहे. तर जिल्ह्यात २७४ चालकांची रिक्त पदे आहेत. दररोज ४३०० कि.मी. अंतर रद्द होऊन ११ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाला ५१ हजार रुपये प्रवासी कर मिळत नाही. मलकापूर आगाराला ऊर्जितावस्था आणावयाची असल्यास येथे नवीन गाड्या पुरविल्या पाहिजेत. तातडीने येथील चालक-वाहकांची पदे भरली पाहिजेत. जनता गाड्यांच्या फेऱ्यामध्ये वाढ केली पाहिजे.
त्याचबरोबर अनियमित बससेवा असल्याने प्रवासी वर्ग एस.टी. पासून लांब जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा एकाचवेळी एकाच मार्गावर तीन-चार गाड्या धावतात, तर अनेकवेळा तासन्तास गाड्यांची वाट पहात बसावे लागते. ग्रामीण भागात एस.टी. वेळेवर सोडली पाहिजे. खासगी वाहतुकीवर शासनाने निर्बंध आणले पाहिजेत. तरच मलकापूर एस.टी. डेपोला ऊर्जितावस्था प्राप्त होईल.
शासनाने दुर्गम व ग्रामीण भागातील एस.टी. डेपोसाठी विशेष पॅकेज देऊन सर्वसामान्यांची एस.टी. वाचली पाहिजे. तर येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली एस.टी. म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली पाहिजे. शाहूवाडी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी शासन दरबारी मलकापूर आगाराविषयी प्रश्न मांडून सर्व सर्वसामान्यांचा डेपो वाचविण्याची मागणी जोर धरत आहे.