मालेच्या सोसायटीतील गैरव्यवहार कोटीच्या घरात
By Admin | Updated: January 16, 2015 00:42 IST2015-01-16T00:35:37+5:302015-01-16T00:42:28+5:30
चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती : दुप्पट धनाच्या मोहापायी उधळला पैसा

मालेच्या सोसायटीतील गैरव्यवहार कोटीच्या घरात
विश्वास पाटील -कोल्हापूर -माले-माळवाडी (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ सेवा सोसायटीचा सचिव गुलाब घनश्याम सोळसे व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निरीक्षक भरत बाबूराव घाटगे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत असल्याची तक्रार संस्थेच्या संचालकांनीच जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली.
गावातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा सोळसे याने दुप्पट पैसे करून मिळतील, या आमिषाने उधळला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यात सोळसेइतकाच किंबहुना त्याहून जास्त भरत घाटगे या गैरव्यवहाराला जबाबदार असल्याची तक्रार संचालकांनी केली. त्यामुळे त्याला तातडीने निलंबित करून या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी उपलेखापरीक्षक एस. एस. बलकवडे यांची नियुक्ती केली आहे.
संचालकांच्या तक्रारीनुसार संस्थेचे स्वभांडवल ६० लाख रुपये, गायी-म्हशींची बोगस प्रकरणे करून किमान १२ लाख रुपये आणि जूनअखेर सोसायटीत सभासदांच्या खात्यावरील रकमांची फिरवाफिरव करून सुमारे २५ लाख असा एक कोटीचा हा गैरव्यवहार आहे. त्याची रीतसर चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून हा आकडा कमी-जास्त होऊ शकतो.
गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता; परंतु त्याचे गांभीर्य संचालक मंडळाच्या लक्षात आले नाही. वारणा साखर कारखान्याचे संचालक वसंत सखाराम सोळसे हे या संस्थेचे संस्थापक आहेत. डिसेंबर १९९६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची उलाढाल अडीच कोटींवर गेली. सचिव चांगला असल्याने संस्थेचा विकास झाला, या भावनेतून संचालक मंडळाने सोळसे जे काही करील त्यास संमती दिल्याने हा घोटाळा झाला आहे.
ज्यांचे पीककर्ज आहे, त्यांनीच सोळसे याला चेकवर सह्या करून दिल्या आहेत. त्याने ही रक्कम दारू व दामदुपटीच्या मोहापायी खर्च केल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. ही रक्कम आपण भरून देऊ, असे सोळसे याने सांगितल्याने तक्रार करण्यापेक्षा संचालकांनी आणखी काही महिने त्याच्यावर
विश्वास ठेवला.
‘लोकमत’च्या दणक्याने तालुक्यात खळबळ
निरीक्षक घाटगे हा माजी आमदार विनय कोरे यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या वारणानगर येथेच निवृत्ती कॉलनीत राहायला आहे. त्याच्याबद्दल कोरे गटातूनच अनेकांच्या तक्रारी होत्या.
गुलाल लावून, सावकरांचे नाव सांगून तो प्रत्येकावर गुरगुरत असे; त्यामुळे ‘लोकमत’मध्ये त्याच्या गैरव्यवहाराचे वृत्त झळकल्यावर वारणेतूनच अनेकांचे फोन आले. त्यांनी ‘झाले ते चांगलेच झाले...!’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.