संदीप आडनाईककोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्राॅग या दुर्मीळ बेडकाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील 'एसएसपीएम मेडिकल काॅलेज ॲन्ड लाइफटाइम हाॅस्पिटल'मध्ये हा वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला. सामान्यत: पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक डिसेंबर महिन्यात दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मलबार ग्लायडिंग फ्राॅग हा पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा बेडूक आहे. हवेत उडत जाणारा बेडूक म्हणून याची ओळख आहे. मात्र, दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्येच प्रामुख्याने याचा अधिवास आहे. कुडाळ तालुक्यातील धामापूर परिसरातही याची नोंद झाली आहे. मात्र, १ डिसेंबर रोजी 'एसएसपीएम मेडिकल काॅलेज ॲन्ड लाइफटाइम हाॅस्पिटलच्या आवारात 'मायक्रोबायोलॉजी लॅब टेक्निशियन' पदावर काम करणाऱ्या जागृती सावंत यांना या 'मलबार ग्लायडिंग फ्राॅग'चे दर्शन झाले. हा बेडूक वेगळा वाटल्याने त्यांनी त्याची छायाचित्रे आय-नॅचरलिस्ट यांच्या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर त्याची ओळख पटली. पावसाळी हंगामात प्रामुख्याने दिसणारा हा बेडूक वर्षातील नऊ महिने शीतनिद्रेसाठी झाडांच्या उंच फांद्यांवर जाताे. मात्र, त्याचे डिसेंबर महिन्यात झालेले दर्शन आश्चर्याचे होते. कुडाळ परिसरात १ डिसेंबर रोजी तुरळक स्वरुपात पाऊस झाल्याने या बेडकाची शीतनिद्रा भंग पावल्याने त्याचे दर्शन झाल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कुडाळच्या रुग्णालयात आढळला उडणारा 'मलबार ग्लायडिंग फ्रॉग', पावसाळी हंगामाऐवजी डिसेंबरमध्ये आढळल्याने आश्चर्य
By संदीप आडनाईक | Updated: December 11, 2024 12:21 IST