सख्य करा, पण जागांवर गंडांतर नको
By Admin | Updated: April 17, 2015 00:13 IST2015-04-16T23:44:41+5:302015-04-17T00:13:37+5:30
तासगाव-कवठेमहांकाळकरांची मागणी : जिल्हा बँक निवडणुकीसाठी जयंतरावांची चाचपणी

सख्य करा, पण जागांवर गंडांतर नको
सांगली : निवडणुकीत कोणाशीही सख्य केले तरी आमची हरकत नाही, पण राष्ट्रवादीच्या दोन्ही तालुक्यातील जागांवर कोणतेही गंडांतर नको, अशी मागणी गुरुवारी तासगाव व कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याकडे केली. जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात जयंतरावांनी तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सांगलीत त्रिकोणी बागेसमोरील कार्यकर्त्याच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, इच्छुक यावेळी उपस्थित होते. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांशी जयंतरावांनी उशिरापर्यंत चर्चा केली. या बैठकीसाठी तासगावातून दिनकर पाटील, किशोर उनउने, हणमंत देसाई, कवठेमहांकाळमधून विजय सगरे यांच्यासह सुमारे ३0 कार्यकर्ते उपस्थित होते. दिनकर पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील असताना तासगाव तालुक्याला तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्याला दोन जागा होत्या. आबा आता आमच्यात नाहीत. त्यामुळे जयंतरावांनी याबाबत निर्णय घेताना दोन्ही तालुक्यांमधील पक्षाच्या जागांवर गंडांतर येणार नाही, याची काळजी घ्यावी. एकत्रित पॅनेल करायचे किंवा कोणाला सोबत घ्यायचे, याबाबतचा निर्णय सर्वस्वी जयंतरावांचाच असेल. त्याबाबत आमची कोणतीही अट नाही. एकत्रित येताना आमच्या जागा कमी होऊ नयेत, अशी आम्ही मागणी केली आहे. दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठक घेऊन उमेदवारांची नावे कळवतील. त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सुचविले आहे. मिरज तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी मागणी केली.
मिरजेसाठी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, अतहर नायकवडी, किरण सूर्यवंशी उपस्थित होते. खानापूरसाठी बाबासाहेब मुळीक व आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी जयंतरावांनी चर्चा केली. बैठकीस विलासराव शिंदे, संजय बजाज, दिलीपतात्या पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जयंतरावांकडे सर्वाधिकार
बहुतांश तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पॅनेल आणि उमेदवार निवडीचे अधिकार जयंतरावांना दिले. केवळ तासगाव आणि कवठेमहांकाळमधील पदाधिकाऱ्यांनी उमेदवार निवडीचे अधिकार तालुक्याकडे घेतले.