राहुल पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:48+5:302021-01-23T04:25:48+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलामध्ये राहुल पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी ज्येष्ठ ...

Make Rahul Patil the President of Zilla Parishad | राहुल पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करा

राहुल पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलामध्ये राहुल पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आतापर्यंत फार चर्चेत नसलेले पाटील हे देखील आता या पदाचे दावेदार मानले जाणार आहेत.

पोलीस मैदानावरील कार्यक्रमानंतर रेसिडेन्सी क्लबवर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व मंत्री, दोन्ही खासदार आणि दोन्ही कॉंग्रेसचे आमदार यांनी भोजन घेतले. यानंतर पवार थांबलेल्या दालनामध्ये पी.एन. पाटील यांनी राहुल यांच्यासह पवार यांची भेट घेतली. पदाधिकारी बदल होणार आहे तेव्हा राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित असलेल्या हसन मुश्रीफ यांनी, राहुल इतकी गडबड कशाला करताय. अजून आधीच्यांचे राजीनामे तरी होऊ देत अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे पदाधिकारी बदलामध्ये अध्यक्षपदासाठी आणखी एक प्रबळ दावेदाराचा प्रवेश झाला आहे. अध्यक्षपद हे इतर मागाससाठी आरक्षित असल्याने राहुल यांचा दाखलाही तयार असल्याचे मानले जात आहे. या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी पवार यांची भेट घेतली.

चौकट

शेवटचा कार्यक्रम असल्याने उत्साह

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणामध्ये केलेल्या उल्लेखामुळे पुन्हा पदाधिकारी बदलाचा विषय पुढे आला आहे. पदाधिकाऱ्यांना हा शेवटचा कार्यक्रम आहे असे वाटल्याने त्यांच्यात उत्साह दिसून येत आहे, असे मुश्रीफ म्हणाले आणि हशा पिकला.

चौकट

पवार यांच्या गाडीत धैर्यशील माने

सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना होताना शरद पवार यांच्या गाडीत मंत्री जयंत पाटील आणि खासदार धैर्यशील माने एकत्रच बसून गेल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Web Title: Make Rahul Patil the President of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.