कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणा अंतर्गत बगिचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचना बदलावी, अशी मागणी समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने गुरुवारी केली. त्याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले.विद्यापीठातील शिवपुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे आम्ही स्वागत करत आहोत; मात्र, तेथील संरक्षक कठड्यासाठी सध्या काडाप्पा फरशीचा वापर केला जात आहे. या कठड्याची रचना मोगली पद्धतीची दिसत असून, ते पुतळा परिसराला शोभणारे नाही. हा कठडा काळ्या दगडांमध्ये अथवा सिमेंट कॉक्रीट ब्लॉकमध्ये किल्ल्याच्या बुरुजावर असणाऱ्या पाकळ्यांच्या आकारात असावे. त्याबाबत मराठेशाहीतील किल्ल्यांवरील रचना विचारात घ्यावी.
शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे समितीने केली. समितीतील संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, रमेश मोरे, आदींनी सध्या कठड्यासाठी वापरलेला दगड आणि त्याच्या रचनेला विरोध केला. त्यावर उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी या कठड्याच्या कामासाठी वापरलेल्या दगडाची माहिती दिली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, कृती समितीचे रणजित मंडलिक, अनिल कारंडे, मदन चोडणकर, चंद्रमोहन पाटील, रूपेश रोडे, रामभाऊ कोळेकर, अजित सासने, महेश जाधव, दीपक थोरात, पार्थ मुंडे, आदी उपस्थित होते.
जनभावनांचा विचार केला जाईलहेरिटेज समितीने मान्यता दिल्यानुसार सुशोभीकरणाचे काम सुरूआहे. समितीने मांडलेल्या जनभावनेचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन कुलगुरूडॉ. शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले.