‘कन्यागत’साठी प्रसिद्धीमाध्यम योजना तयार करा
By Admin | Updated: July 1, 2016 00:38 IST2016-07-01T00:36:30+5:302016-07-01T00:38:28+5:30
देवरा यांच्या सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक; महापर्वकाळ सोहळ्याची तयारी सुरू

‘कन्यागत’साठी प्रसिद्धीमाध्यम योजना तयार करा
कोल्हापूर : ‘कन्यागत महापर्वकाळ-२०१६’ हा सोहळा सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रभावी प्रसिद्धीमाध्यम योजना तयार करून कार्यवाही करा, अशा सूचना गुरुवारी पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिल्या. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे दि. १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळासाठी सुरू असलेल्या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत पालक सचिव देवरा बोलत होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी प्रमुख उपस्थित होते. ‘कन्यागत’साठी तयार केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्यक्रमाने कार्यवाही करावी, तसेच हा सोहळा सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रसिद्धीमाध्यम योजना तयार करून कार्यवाही करा, आराखड्यानुसार सर्व विभागांनी कार्यवाही करावी, या कामास संबंधित यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच या सोहळ्यानिमित्त करावयाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून सर्व विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना देवरा यांनी केल्या. बैठकीत ‘कन्यागत’ सोहळ्यानिमित्त करावयाची प्रसिद्धी, आपत्ती व्यवस्थापन, घाटांची, रस्त्यांची उभारणी स्वच्छता, चेंजिंग रूम्स, तात्पुरती निवास व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, दळणवळण सुविधा आदींबाबत देवरा यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी चंद्रकांत मुगळी, सहाय्यक नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. कुणाल खेमनार, पी. शिवशंकर, आमदार अमल महाडिक, डॉ. अमित सैनी, आमदार उल्हास पाटील, आदी उपस्थित होते.