माध्यमांनी विकासाचे साथीदार बनावे

By Admin | Updated: October 16, 2015 00:10 IST2015-10-15T01:06:17+5:302015-10-16T00:10:18+5:30

देवानंद शिंदे : ‘फेम’, ‘आसमा’, होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन, प्रेस क्लबतर्फे राष्ट्रीय जाहिरात दिन पुरस्काराचे वितरण

Make media partners for development | माध्यमांनी विकासाचे साथीदार बनावे

माध्यमांनी विकासाचे साथीदार बनावे

कोल्हापूर : माध्यम, जाहिरात क्षेत्राचे सामाजिक परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी आता शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील विकासाचे साथीदार बनावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी येथे केले.‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ ही संकल्पना घेऊन फेडरेशन आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅँड मार्के टिंग एन्ट्रप्रुनर्स (फेम), अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज अ‍ॅण्ड मीडिया असोसिएशन (आसमा), कोल्हापूर होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य मूलभूत गरजांमध्ये आता माध्यमांची भर पडली आहे. त्यात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडियासह जाहिरात क्षेत्राचा समावेश आहे. सामाजिक परिवर्तनामध्ये माध्यम व जाहिरात क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून ही क्षेत्रे प्रभावशाली आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्रांतीने नवी आव्हाने उभारली असून जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज असून त्यादृष्टीने माध्यम, जाहिरात क्षेत्राने प्रबोधन करावे. शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रांतील विकासाचे साथीदार म्हणून कार्यरत राहावे.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झाले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘आसमा’चे उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, खजानिस राजाराम शिंदे, कोल्हापूर होर्डिंग्ज व आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खमितकर, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विकास कांबळे, आदी उपस्थित होते. अनंत खासबारदार यांनी स्वागत केले. ‘फेम’ व ‘आसमा’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. विवेक मंद्रुपकर यांनी सूत्रसंचालन केले. कौस्तुभ नाबर यांनी आभार मानले.


पुरस्कार : माध्यमातील ज्येष्ठांचा सत्कार
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते किशोर संकपाळ (वरिष्ठ जाहिरात अधिकारी, लोकमत), सुरेश पवार (वरिष्ठ कार्यकारी संपादक, पुढारी), विजय जाधव (निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स), संजय पाटोळे (सहसंपादक, सकाळ), विजय धामणेकर (वितरण प्रतिनिधी, तरुण भारत), आनंद जगदाळे (मुद्रितशोधक, पुण्यनगरी), मनोज कुलकर्णी (ज्येष्ठ व्हिडिओ एडिटर, बी चॅनेल), उदय कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, राजेंद्र मकोटे (मुक्त पत्रकार) यांना राष्ट्रीय जाहिरात दिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. उदय कुलकर्णी यांच्यावतीने जगन्नाथ कुलकर्णी आणि प्रभाकर कुलकर्णी यांच्यावतीने प्रसन्न कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.


सरस कामगिरी करू
व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन ‘फेम’ व ‘आसमा’ने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. कोल्हापुरातून ‘आसमा’च्या माध्यमातून सुरू झालेली ‘फेम’ आता नागपूर, जळगावपर्यंत पोहोचल्याचे ‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, नवतंत्रज्ञान आत्मसात करून मुंबई, पुण्याच्या संस्थांपेक्षा कोल्हापुरातील संस्थांच्या सरस कामगिरीसाठी प्रयत्न करू.


कुलगुरू म्हणाले...
पाण्याच्या नियोजनातील अभाव माध्यम, जाहिरात क्षेत्राने समोर आणावा.
कोल्हापुरातील विविध क्षेत्रांमधील गुणवत्ता पुढे नेण्यासाठी बळ द्यावे.
युवा पिढीकडून तंत्रज्ञानाच्या विवेकपूर्ण वापरासाठी प्रबोधन करा.
‘एम-लर्निंग’च्या दिशेने पावले टाकावीत.

Web Title: Make media partners for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.