लढा यशस्वी करा, एक एकर जमीन मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:25+5:302021-09-17T04:29:25+5:30
जयसिंगपूर : एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याच्या शिफारसीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...

लढा यशस्वी करा, एक एकर जमीन मिळवा!
जयसिंगपूर : एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याच्या शिफारसीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, यात एकही आमदार, खासदार अथवा लोकप्रतिनिधी अद्याप सहभागी झालेला नाही. यामुळे उद्विग्न झालेल्या (नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील एका शेतकऱ्याने या लढ्यात उतरून प्रसंगी रक्त सांडून तो यशस्वी करून दाखवणाऱ्या नेत्याला (आमदार, खासदार) स्वत:ची एक एकर बागायत जमीन बक्षीस देऊ, अशी घोषणा गुरुवारी केली आहे. त्यांचे हे आव्हान कोणी स्वीकारणार का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
रामगोंडा पाटील, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच ते कार्यकर्ते आहेत. त्यांची नांदणी येथे नऊ एकर जमीन आहे. ऊस दराच्या प्रश्नासाठी आतापर्यंत राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरची लढाई लढली आहे; पण इतर राज्यकर्त्यांकडून भ्रमनिरासच होत असल्याने आपण राजकारणी नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. राज्यात २८८ आमदार आणि ४८ खासदार आहेत. त्यांनाही माझे खुले आव्हान आहे. शेट्टी यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांचा एकरकमी एफआरपीचा लढा यशस्वी करावा. त्याला स्वत:ची एक एकर बागायत जमीन बक्षीस देऊ. पाटील यांची ही घोषणा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.
चौकट -
एक का दोन एकर देऊ : पाटील
एक रकमी एफआरपी मिळून लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, तर आपली एक एकरच का दोन एकर जमीन जरी गेली तर चालेल, असेही पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.