रस्ते करण्याच्या पद्धतीत बदल करा
By Admin | Updated: January 16, 2015 00:14 IST2015-01-16T00:05:09+5:302015-01-16T00:14:11+5:30
अतिरिक्त आयुक्तांचा आदेश : ठेकेदारांच्या चालुगिरीस अभियंतेच जबाबदार--लोकमतचा दणका

रस्ते करण्याच्या पद्धतीत बदल करा
कोल्हापूर : शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या १०८ कोटी रुपयांचे रस्ते तसेच महापालिका तसेच शासनाच्या विशेष निधीतून १५०हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांची बांधणी सुरू आहे. या रस्त्यांच्या दर्जाबाबत सर्वस्वी त्या-त्या प्रभागांतील कनिष्ठ व साहाय्यक अभियंते जबाबदार आहेत. कामात चालूगिरी आढळल्यास ठेकेदारांसह अभियंत्यांवरही कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आज, गुरुवारी दिला. कदमवाडी ते सदर बाजार येथील दीड वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्यावर शेवटचा बारीक खडी-डांबराचा थर करण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने काल, बुधवारी नागरिकांनी हे काम बंद पाडले. याबाबत नागरिक ांनी जाब विचारताच ठेकेदाराने काम बंद करून पोबारा केला. याची ‘लोकमत’ने गुरुवारी छायाचित्रांसह वस्तुस्थिती मांडली. या प्रकरणाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी ठेकेदारांच्या चालुगिरीस अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट केले.सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. डांबर-खडीची पावडर-लाली लावून रस्ता केल्याचा दिखावा के ला जात आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी खराब रस्त्याप्रकरणी संबंधित विभागीय कार्यालयांतील अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे आदेश जारी केले. त्यानंतर धास्तावलेल्या यंत्रणेने रस्ता सुरू होण्यापूर्वी प्रत्यक्ष कामास भेटी देण्यास सुरुवात केली. शहरात कोट्यवधी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर ठेकेदारांकडून चालूगिरी सुरू आहे. ‘पीडब्ल्यूडी’च्या निकषांना हरताळ फासला जात आहे. (प्रतिनिधी)
डांबराचे कमी प्रमाण झाकण्यासाठी दगडी पीठ अधिक प्रमाणात वापरले जाते. शहरातील अनेक रस्त्यांवर ठेकेदारांनी अशी चालूगिरी सुरू केली आहे. त्यास आता चाप बसणार आहे. अशाप्रकारचे पीठ टाकू नका. डांबर मिसळून बारीक खडीचा थरच रस्त्यावर टाका, भुकटी टाकल्याचे आढळल्यास बिले मिळणार नाहीत. सर्व नव्याने केलेल्या रस्त्यांचे सर्व्हेक्षण करा, असे आदेश देसाई यांनी संबंधितांना दिले आहेत.