मोठ्या कंपन्यांचा कोल्हापूरला नकार

By Admin | Updated: December 3, 2014 00:24 IST2014-12-03T00:14:26+5:302014-12-03T00:24:05+5:30

कास्टिंगचे दर वाढल्याचा फटका : गुजरात, तमिळनाडू, कर्नाटककडे वळल्या आॅडर्स; ४० टक्क्यांनी उत्पादनात घट

Major companies refuse to Kolhapur | मोठ्या कंपन्यांचा कोल्हापूरला नकार

मोठ्या कंपन्यांचा कोल्हापूरला नकार

संतोष मिठारी - कोल्हापूर --कच्चा माल, वीज आणि पाणी दरातील वाढीमुळे कास्टिंग उत्पादन महागले. त्याचा फटका जिल्ह्यातील उद्योगांना बसला आहे. देशभरातील मोठ्या कंपन्यांनी कोल्हापूरला नकार देत स्वस्त कास्टिंग मिळणाऱ्या गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडूमधील उद्योगांकडे आपल्या आॅडर्स वळविल्या आहेत. त्याचा फटका उत्पादननिर्मितीला बसला आहे. साधारणत: ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादन कमी झाले आहे.
‘फौंड्री हब’ अशी कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कास्टिंग निर्मितीद्वारे येथील उद्योजकांनी आपले वेगळेपण निर्माण केले आहे. त्यामुळे देशभरातील अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनातील विविध सुट्या भागांचे काम येथील उद्योगांना देतात; पण गेल्या चार वर्षांपासून मोठ्या कंपन्या कोल्हापूरला आॅडर्स देण्यास नकार देत आहेत. त्याला कास्टिंगची दरवाढ कारणीभूत आहे. वीस टक्क्यांनी महागलेला कच्चा माल, ३५ टक्क्यांनी वीज आणि ४० टक्क्यांनी पाणीदर वाढले आहेत. त्यामुळे कास्टिंग उत्पादनाचा खर्चात वाढ झाली आहे. शिवाय व्हॅट, एलबीटी, घरफाळा, वीज आकार, इन्कमटॅक्स, स्टॅम्पड्यूटी, भू आणि प्रॉपर्टी टॅक्स, कस्टम ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, एक्साईजसारखे २२ प्रकारचे कर उद्योजकांना वर्षाला
भरावे लागतात. त्याचा परिणाम उत्पादन खर्च वाढण्यावर झाला आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील स्पर्धक उद्योगांच्या तुलनेत कोल्हापुरातील उद्योगांतून उत्पादित झालेले
कास्टिंग दोन ते तीन रुपयांनी महाग झाले आहे.
जागतिक पातळीवरील मंदीमुळे मोठ्या कंपन्यांना येथील उद्योगांपेक्षा गुजरात, कर्नाटक, तमिळनाडूमधील उद्योग किलोमागे तीन रुपयांनी स्वस्त दरात कास्टिंग देत आहेत. काहींनी चायना, ब्राझीलमधील कास्टिंगचादेखील पर्याय निवडला आहे. शिवाय महाराष्ट्रातील करप्रणाली क्लिष्ट असल्याने मोठ्या कंपन्या, उद्योग ज्या-त्या राज्यांतून कास्टिंग खरेदी करीत आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये तीनशे फौंड्री असून, त्यांच्याकडून दरमहा उत्पादित केल्या जाणाऱ्या तीन हजार टन कास्टिंगचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. कास्टिंगच्या आॅडर्स संबंधित राज्यातील कारखानदारांकडे वळल्याने स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसला आहे.


कामाचे प्रमाण घटले
मंदीच्या स्थितीमुळे फौंड्री उद्योगाकडील आॅडर्स कमी झाल्या आहेत. उत्पादनखर्च वाढल्याने त्याचीदेखील त्यात भर पडली आहे. अन्य राज्यांतील उद्योगांना मिळत असलेल्या सोयी-सवलतींमुळे त्यांच्याशी महाराष्ट्रातील उद्योगांना स्पर्धा करणे जिकिरीचे बनले आहे. आपल्याकडील कास्टिंग महागल्यामुळे कामाचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढविण्यासाठी सरकारने रस्ते, पूल अशी पायाभूत सुविधांची कामे सुरू करणे गरजेचे आहे.
- व्ही. एन. देशपांडे (चेअरमन, साऊंड कास्टिंग प्रा. लि.)

एक टन कास्टिंगसाठी ५७ रुपये खर्च
एक किलो कास्टिंग उत्पादनासाठी वीज, पाणी, लेबर आदींसह एकत्रितपणे ५५ ते ५७ रुपये खर्च येतो. त्यानंतर उद्योजक त्याची ५६ ते ५८ रुपयांपर्यंत विक्री करतात. त्या तुलनेत कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये तीन रुपयांनी स्वस्त कास्टिंगची विक्री केली जाते.
उद्योग स्थलांतराच्या मार्गावर
उत्पादनखर्च वाढल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उद्योगांना कसरत करावी लागत आहे. त्यावर उद्योगांनी स्थलांतराचा पर्याय निवडला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग कर्नाटककडे, मुंबईमधील सूरत, बडोदा आणि गुजरात, नागपूरकडील उत्तरांचलमध्ये स्थलांतराच्या मार्गावर आहेत.


स्पर्धक वाढलेत
विजेची दरवाढ, दुहेरी करांचा भार, महागलेला कच्चा माल आदींमुळे एकूणच महाराष्ट्रातील कास्टिंगचे उत्पादन खर्चिक झाले आहे. शेजारील राज्यांमध्ये उद्योगांना अनुदान, सोपी करप्रणाली, वीज, पाणी स्वस्त असल्याने ते आमच्यापेक्षा कमी दराने कास्टिंगची विक्री करतात. दरवाढीचा बोजा सहन करत देशांतंर्गत गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि जागतिक पातळीवर चायना, ब्राझीलसमवेत स्पर्धा करावी लागत असून, त्यात दिवसेंदिवस वाढतच होत आहे. त्यामुळे उद्योजक मेटाकुटीस आले आहेत.
- शामसुंदर देशिंगकर (उद्योजक)

Web Title: Major companies refuse to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.