लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एसी मशीनची देखभाल दुरुस्ती वेळेत नाही आणि वापर वाढला तर मुख्य सर्किटवर ताण पडून ते गरम होते. हॉस्पिटलमध्ये एसीचा वापर २४ तास सुरू असतो, त्या पटीत देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने त्यातूनच शॉर्टसर्किटच्या घटना घडतात.
विरार (ठाणे) येथे एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन हॉस्पिटलला आग लागली. यामध्ये १५ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. जीवघेण्या उष्म्यापासून एसीमध्ये गारवा मिळतो. मात्र हा गारवाच आता जीवावर बेतू लागला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह दुकानातही आपणाला एसीचा वापर सर्रास दिसतो. दुकाने व कार्यालयात उन्हाळ्यात बारा-तेरा तास एसी सुरूच असतो. हॉस्पिटलमध्ये तर २४ तास एसी असतो. त्यामुळे येथे एसीची मशिनरी लवकर खराब होते, त्यातून वॉटर लिकेज होणे आदी समस्या तयार होतात. अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जाते. हॉस्पिटलमध्ये वापर अधिक असतो, मात्र त्या पटीत त्याची देखभाल, दुरुस्ती होत नाही. एसीचे सर्किट गरम होते आणि त्यातून शॉर्ट सर्किट होते.
जेवढा वापर होतो, तेवढ्या प्रमाणात त्याची देखभाल होत नसल्याने एसींचा स्फोट होऊन आग लागण्याचे प्रकार घडतात. पैसे वाचवण्यासाठी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यातून अपघात घडतो.
वापरावरच एसीचे आयुष्यमान
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचे आयुष्यमान हे त्याच्या वापरावर असते. एसी हे किमान १० वर्षे आयुष्यमान असते. घरी अथवा खासगी कार्यालयात व्यवस्थित देखभाल केली तर १५ वर्षापर्यंत तो चालतो. हॉस्पिटलसह ज्या ठिकाणी उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात २४ तास एसी सुरू असतो, तिथे मात्र सहा-सात वर्षात एसी खराब होतो.
कोट-
इलेक्ट्रॉनिक वस्तू जेवढ्या चांगल्या तितक्याच घातकही असतात. आपण त्याची देखभाल, दुरुस्ती कशी व किती वेळेत करतो, यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात. एसीचे त्यापेक्षा वेगळे नसून वेळेत दुरुस्ती करणे गरजेचे असते.
- अमित पाटील (एसी, टेक्निशियन)