गुळावरील नियमन कायम ठेवा

By Admin | Updated: December 2, 2014 00:13 IST2014-12-01T23:49:56+5:302014-12-02T00:13:54+5:30

अडत्यांची मागणी : शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार

Maintain regular rugs | गुळावरील नियमन कायम ठेवा

गुळावरील नियमन कायम ठेवा

कोल्हापूर : राज्य शासनाने गुळासह पाच वस्तूंवरील नियमन रद्द केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गुळावरील नियमन कायम ठेवण्याची मागणी बाजार समितीमधील अडते, व्यापारी, शेतकऱ्यांनी ‘पणन’चे उपसरव्यवस्थापक प्रकाश अष्टेकर यांच्याकडे केली. गुळावर नियमन कायम ठेवावे, हमीभाव द्यावा आदी मागण्या शेतकऱ्यांनी सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पणन मंडळाने शेतकरी, अडते व बाजार समिती प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रकाश अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने बैठक घेऊन आढावा घेतला.
शासनाने एप्रिल २०१४ पासून गूळ, रवा-मैदा, साखर, खाद्य तेल व ड्रायफु्रट यावरील नियमन रद्द केले आहे. त्यामुळे बाजार समितीचे नियंत्रण या मालाच्या विक्रीवर राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी त्यांचा माल कुठेही विक्री करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याला शेतकऱ्यांचाच विरोध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबणा सुरू असल्याचे कोल्हापूर जिल्हा गूळ उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. त्याला दुजोरा देत येथे लहान गूळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गुऱ्हाळघरांवर एकाच प्रतीचा गूळ निघत नसल्याने त्याची विक्री होताना दर पाडण्याची शक्यता अधिक असल्याचे नियमन समितीचे सदस्य व शाहूपुरी व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनाडे यांनी निदर्शनास आणून दिले. गूळ नियमन रद्द केले तर दराबाबत व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा राहणार नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पैशांची हमी कोण घेणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे बाजार समितीचे सचिव संपतराव पाटील यांनी सांगितले. सेवाशुल्क प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळा आहे, तो एकसारखा ठेवण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. शेतकरी, अडते व बाजार समिती प्रशासनाची भूमिका पणन मंडळासमोर मांडून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन प्रकाश अष्टेकर यांनी दिले.
दरम्यान, बैठकीच्या अगोदर समितीच्या सदस्यांना गुळाचे सौदे खुल्या पद्धतीने कसे काढले जातात, दरासाठी व्यापाऱ्यांमध्ये कशी चढाओढ लागते याची माहिती दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, पणन मंडळाचे कोल्हापूर विभागीय उपव्यस्थापक सुभाष घुले, बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे, सांगली बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Maintain regular rugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.