अतिक्रमणात अडकला ‘मुख्य बस मार्ग’
By Admin | Updated: February 26, 2015 00:06 IST2015-02-25T23:52:40+5:302015-02-26T00:06:15+5:30
चार वर्षे बससेवा बंद : अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा उत्तम; नागरिक रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

अतिक्रमणात अडकला ‘मुख्य बस मार्ग’
कोल्हापूर : अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासह इतर सुविधा चांगल्या; पण गेली चार वर्षे उखडून पडलेल्या मुख्य बसरूटच्या रस्त्यामुळे फुलेवाडी प्रभागातील नागरिक हैराण आहेत. ‘नगरोत्थान’मधून रस्ता मंजूर झाला आहे; पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगण्यात येते. रस्ता उखडल्याने या मार्गावरील बसवाहतूक गेली चार वर्षे बंद असून, धुळीने नागरिकांची दमछाक झाली आहे. सुमारे ३०-३५ फुटांचे प्रशस्त रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या गटारी आणि बहुतांश कौलारू घरे असा ग्रामीण तोंडावळा असणारा फुलेवाडी प्रभाग आहे. शहराजवळ असला तरी या प्रभागात मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. गुऱ्हाळघरे, जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. येथील राहणीमानही एखाद्या शहरी गावासारखेच आहे. बसस्टॉप मार्गाची उत्तरेकडील बाजू, शेळके कॉलनी, जयभवानी कॉलनी, ग्रामसेवक कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, फुलेवाडी दत्तमंदिर परिसर, रिंग रोडचा पूर्वेकडील भाग अशी साधारणत: पावणेसहा हजार मतदार संख्या या प्रभागात येते. कोल्हापूर शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत या प्रभागातील अंतर्गत रस्ते चकाचक दिसतात.
बहुतांश ठिकाणी गटर्स आहेत, पाणी मुबलक आहे, कचरा उठावही वेळेत होतो, असे नागरिकांमधून सांगण्यात येते. येथे खरी समस्या आहे ती मुख्य बस रूटचा रखडलेला रस्ता. गेली चार वर्षे हा रस्ता उखडून टाकल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे काम करता येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले; पण नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगण्यात आले.
शेळके कॉलनीत काही ठिकाणी गटारी व रस्त्यावरील दिव्यांचा प्रश्न भेडसावत आहे. अनेक वेळा गटर्स काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दत्तमंदिराशेजारी असणारे सांस्कृतिक सभागृह वापराविना पडून आहे. नागरिकांनी ते वापरासाठी मागितले होते; पण महापालिकेचे दर पाहता ते त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे.
मूलभूत सुविधा देत असताना नागरिकांच्या इतर अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत अनेक विकासकामे केलीत. अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता रखडला आहे. २ ते ६ क्रमांक बसस्टॉपपर्यंत बेड तयार केले आहे. ग्रीन बेल्ट असल्याने अनेक ठिकाणी निधी लावता येत नाही. नागरिकांनी सहकार्य केले तर मुख्य रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावू. - सर्जेराव पाटील, नगरसेवक, फुलेवाडी