‘महावितरण’ने ग्रामपंचायतींचा थकीत कर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:43+5:302021-07-03T04:16:43+5:30
गडहिंग्लज : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विद्युतखांब, विद्युत जनित्रे आणि वीजवाहिन्यांचा थकीत कर ग्रामपंचायतींना तातडीने द्यावा, अशी एकमुखी मागणी ...

‘महावितरण’ने ग्रामपंचायतींचा थकीत कर द्यावा
गडहिंग्लज : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विद्युतखांब, विद्युत जनित्रे आणि वीजवाहिन्यांचा थकीत कर ग्रामपंचायतींना तातडीने द्यावा, अशी एकमुखी मागणी गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली.
कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज तालुका सरपंच परिषदेचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे होते.
कांबळे म्हणाले, तालुक्यातील ग्रामपंचायती व सरपंच यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना ताकदीने काम करेल. लवकरच तालुक्यातील सरपंचांची कार्यशाळा घेतली जाईल.
पंधराव्या वित्त आयोगातील कामांच्या प्रस्तावातील बदलाचे अधिकार पूर्वीप्रमाणे ‘बीडीओं’ना द्यावेत. नळयोजनेच्या वीज बिलांसाठी व टीसीएलसाठी अनुदान मिळावे. जीएसटी, कर सल्लागाराचे मानधन, जीएसटी करसल्लागाराचे मानधन लोकसंख्येच्या प्रमाणात १० ते २० हजारांच्या दरम्यान असावे, पथदिव्यांची बिले जिल्हा परिषदेने भरावी, सरपंचांचे मानधन वेळेत मिळावेत, आदी १५ मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
मेळाव्यात माजी तालुकाध्यक्ष उदय चव्हाण, मुगळीचे सरपंच बाळय्या स्वामी, हसूरचंपूच्या सरपंच प्रभावती बागी, वडरगेचे सरपंच सुभाष पोटे, हिरलगेचे सरपंच सचिन देसाई, मासेवाडीचे माजी सरपंच दशरथ कुपेकर यांची भाषणे झाली.
मेळाव्यास, महागावच्या सरपंच ज्योत्स्ना पताडे, निलजीचे आप्पासाहेब गडकरी, तनवडीचे बसवराज आरबोळे, नूलच्या प्रियांका यादव, खमलेहट्टीच्या सुरेखा चौगुले, लिंगनूरच्या अॅड. परमेश्वरी पाटील, करंबळीचे प्रवीण माळी, आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष कडगावचे सरपंच संजय बटकडली यांनी प्रास्ताविक केले. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष नेसरीचे सरपंच आशिषकुमार साखरे यांनी आभार मानले.
चौकट :
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज तालुका कार्याध्यक्ष सचिन देसाई, उपाध्यक्षा सुरेखा चौगुले, चिटणीस आप्पासाहेब गडकरी, विधी व न्याय विभागाच्या प्रमुख अॅड. परमेश्वरी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
फोटो ओळी : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय बटकडली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आशिष साखरे, उदय चव्हाण, संजय कांबळे, सुरेखा चौगुले, ज्योत्स्ना पताडे, परमेश्वरी पाटील, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०२०७२०२१-गड-०७