‘महावितरण’चा कारभार कंत्राटदारांच्या हातात

By Admin | Updated: November 11, 2014 23:24 IST2014-11-11T21:35:55+5:302014-11-11T23:24:29+5:30

बिलातील तफावतीमुळे शेतकरी हैराण : अधिकारीही दाद घेत नसल्याने तक्रार करायची कोणाकडे

'Mahavitaran' is in charge of contractors | ‘महावितरण’चा कारभार कंत्राटदारांच्या हातात

‘महावितरण’चा कारभार कंत्राटदारांच्या हातात

प्रकाश पाटील - कोपार्डे -पावसाळा संपल्याने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांची विद्युतपंत बसविण्याची लगबग चालू आहे. मात्र, पावसाळादरम्यान विद्युत तारा, पोल ट्रान्स्फॉर्मरची झालेली मोडतोड यांच्या दुरुस्तीसाठी महावितरणकडून विलंब होत असून, याचा फटका प्रामुख्याने ऊस पिकांना पाणी न मिळाल्याने बसत आहे.
एवढेच नाही, तर काही शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये मीटर रिडिंगपेक्षा जादा बिल आले असून, याबाबत ग्रामीण भागात असणाऱ्या कार्यालयांशी संपर्क साधला असता ‘ते आमचे काम नाही, कंत्राटदारांकडून केले जाते. त्यामुळे तुम्ही मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा,’ असे सांगून येथील अधिकारी हात वर करत असल्याचे चित्र दिसत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळा संपल्याने शेतकरी नदीकाठावर विद्युत मोटारी बसवून प्रामुख्याने ऊस पिकाला पाणी देण्याच्या घाईत आहे. परतीचा पाऊस आॅक्टोबरअखेर लागल्याने व पावसाळ्यात नदीकाठच्या विद्युत पोलची, तारांची व त्यासाठी बसविण्यात येणाऱ्या ट्रान्स्फॉर्मरच्या झालेल्या पडझडीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले नव्हते. याबाबतची तांत्रिक जबाबदारी ज्यांची आहे, त्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनीही लक्ष दिलेले नाही.
शेतकरी याबाबतीत तक्रार घेऊन गेल्यास कंपनीने हे काम कंत्राटदाराला दिले असून, त्यांना सांगतो, असे सांगितले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला की, आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तुम्ही सहकार्य करा, पोल उभा करायला सिमेंट, वाळू द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडेच होते. त्याशिवाय ट्रान्स्फॉर्मर खराब झाला असेल, तर तो आणण्यासाठी वाहन नाही, त्यासाठी वाहन द्या, अशी मागणी कंत्राटदार शेतकऱ्यांकडे करत त्यांना वेठीस धरीत आहेत.
एवढेच नाही, तर मोटारींच्या बिलात एवढी तफावत आहे की, वीज बिल पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर चांदण्या दिसतात. न वापरलेल्या युनिटचेही वीज बिल भरल्याशिवाय अधिकारी मोटारींची जोडणी करून देत नसल्याने अधिकारी, कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत. कोपार्डे (ता. करवीर) येथील शेतकरी दिनेश पाटील यांना याचा अनुभव आला आहे. त्यांनी तीन एचपीच्या विद्युत पंपाची मंजुरी त्यांची आजी हिराबाई पाटील यांच्या नावे आहे. १९ मे २०१४ पर्यंतचे मीटर रिडिंग ७६,२०० एवढे आले होते. याचा आकार २१० रुपये आला होता. तो त्यांनी भरलाही. पुन्हा त्यांना ७ आॅगस्ट २०१४ मध्ये ७६,१३४ एवढी मीटर रिडिंग व त्यापोटी ७५० रुपये वीज बिल आकारणी आली. प्रत्यक्ष मीटर रिडींग ७६,१३४च आहे.
दिनेश पाटील यांनी ग्रामीण कार्यालयाशी संपर्क साधला असता, तुम्ही कोल्हापूर मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगत हात वर केले. यावरून मीटर न पाहताच वीज बिल आकारले जात असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. त्याशिवाय मागील बिलातच जादा आकारणी झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? असा प्रश्न पडत असून, हा शेतकऱ्यांना लुबाडण्याचा व त्रास देण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत.

महावितरण’ची लबाडी उघड
वीज आकाराव्यतिरिक्त आकारण्यात येणाऱ्या इतर आकारांची कसली आकारणी करताय ? असा प्रश्न शेतकरी दिनेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना करताच ज्यावेळी विजेचा तुटवडा कंपनीला होता, त्यावेळी इतर कंपन्यांकडून वीज घेऊन वीजपुरवठा केला जातो.
त्यासाठी महावितरणला जादा पैसे मोजावे लागतात. मग तेच प्रति युनिट विभागणी करून इतर वीज बिल आकारात दाखविले जाते, असे सांगितल्याने ‘महावितरण’ची लबाडी उघड झाली.

Web Title: 'Mahavitaran' is in charge of contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.