काही प्रभागांत चौरंगी-तिरंगी लढत असली तरी खरी लढत ही ताराराणी आघाडी व ग्रामस्थ आघाडी यांच्यामध्ये आहे. महाविकास आघाडी व युवा क्रांती आघाडीने सक्षम उमेदवार उभे केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनलेली आहे. मागील निवडणुकीत भाजप पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवून सात उमेदवार निवडून आणले होते. यावेळीही भाजप स्वतंत्र लढेल असे वाटत होते. मागील सरपंच निवडीसाठी भाजपने पी. एम. पाटील गटाचे सहकार्य घेतल्याने ग्रामस्थ आघाडी सोबत जाण्याचे पसंत केले. नव्याने राजकारणात प्रवेश करून युवकांचा चेहरा असलेल्या युवा क्रांतीने अटीतटीच्या ठिकाणी आपले उमेदवार उभा करून घराणेशाहीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीने तगडे १७ उमेदवार उभे करून पारंपरिक गटाच्या राजकारणाला आव्हान उभे केले आहे. नेहमी सामाजिक व राजकीय कार्यात कार्यरत असणाºया इच्छुकांची उमेदवारी आघाडीने डावल्याने नाराज उमेदवारांनी अपक्ष राहणे पसंत केले आहे. त्यांचा भागातील प्रभाव पाहता पारंपरिक उमेदवारांना शह देतील, असे वातावरण आहे. महाविकास आघाडी व युवा क्रांती आघाडी यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे.
कबनूरमध्ये महाविकास आघाडी, युवा क्रांती आघाडीचे तगडे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST