महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर, आज मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:25+5:302021-07-11T04:18:25+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा आमदार पी. एन. पाटील यांचा आग्रह कायम असल्याचे ...

Mahavikas Aghadi member Panhala, interviews today | महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर, आज मुलाखती

महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर, आज मुलाखती

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचा आमदार पी. एन. पाटील यांचा आग्रह कायम असल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. त्यामुळेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात पुन्हा सायंकाळी बैठक झाली. यामध्ये ठोस काही निष्पन्न झाले नाही. रविवारी पन्हाळ्यावर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यावेळी निर्णय घेऊ असे ठरल्याचे समजते.

शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान येथील अध्यक्ष बंगल्यावर महाविकास आघाडीचे सदस्य एकत्र आले. यानंतर हे सर्व जण पन्हाळ्याकडे रवाना झाले. पन्हाळ्यावर ३५ सदस्य असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सदस्य आज रविवारी पन्हाळ्यावर जाणार आहेत. शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेते, सदस्यांची बैठक झाल्यानंतर पी. एन. यांनी हालचाली करत मुलगा राहुल यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी आग्रह धरला. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडेही हा विषय मांडला. या वेळी पाटील यांनी मुश्रीफ यांच्यासमवेत चर्चा केल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही, असे सांगितल्यानंतर मग शनिवारी संध्याकाळी बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार सायंकाळी सहा वाजता मुश्रीफ आणि सतेज पाटील हे शासकीय विश्रामगृहावर आले. त्यानंतर दहाच मिनिटांमध्ये पी. एन. या ठिकाणी आले. त्यांच्यासमवेत ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी पाटील कवठेकर होते. या तिघांची बैठक सुरू झाल्यानंतर २५ मिनिटांनी सतेज पाटील कामानिमित्त बाहेर पडले. रविवारी सायंकाळी पाच वाजता पन्हाळ्यावर ज्या नेतेमंडळी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यावेळी या तिघांसह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे.

चौकट

पती पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याचे पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी थेट मतदानासाठी येण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना स्थितीमध्ये निवडणुकी दिवशीही अधिक दक्षता घेण्याची गरज यामुळे अधोरेखित झाली आहे.

Web Title: Mahavikas Aghadi member Panhala, interviews today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.