गोंधळ घालणाऱ्या भाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:52+5:302021-07-07T04:30:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातातून सत्ता गेल्याने राज्यातील भाजपचे नेते सैरभैर झाले असून त्यातून विधिमंडळासारख्या पवित्र ठिकाणी हाणामारी ...

गोंधळ घालणाऱ्या भाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हातातून सत्ता गेल्याने राज्यातील भाजपचे नेते सैरभैर झाले असून त्यातून विधिमंडळासारख्या पवित्र ठिकाणी हाणामारी व शिवीगाळी करीत आहेत. गोंधळ घालणाऱ्या भाजपला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
विधिमंडळात भाजपच्या आमदारांनी केलेला गोंधळ व विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी केलेल्या कृत्याविरोधात मंगळवारी शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात भाजपविरोधी निदर्शने करण्यात आली. अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या भाजप आमदारांचा निषेधही यावेळी नोंदवण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, राज्यातील मराठा आरक्षण कशामुळे अडचणीत आले, ओबीसी समाजाचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न केंद्र सरकारच्या पातळीवर आहेत. तिथे जाऊन गोंधळ घालण्यापेक्षा भाजपची मंडळी गल्लीत गोंधळ घालत आहेत. सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या भाजप आमदारांना स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी माफ केले नसते. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनीही भाजप आमदारांवर हल्लाबोल केला. जिल्हा उपप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजीत माने आदी उपस्थित हाेते.
फोटो ओळी : विधिमंडळात भाजपच्या आमदारांनी केलेला गोंधळ व विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी केलेल्या कृत्याविरोधात मंगळवारी शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात भाजपविरोधी निदर्शने करण्यात आली. यावेळी मंजीत माने, विजय देवणे, संजय पवार, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण उपस्थित हाेते. (फोटो-०६०७२०२१-कोल-शिवसेना)