Maharashtra Politics ( Marathi News ) : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. तसेच ' निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटं सांगून मतं का मिळवली?, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी खासदार शेट्टी म्हणाले, कृषीमंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले. अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झालेले पाहायला गेले. तिथे गेल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं बघायला पाहिजे होतं. पण, त्यांनी तिथं शेतकऱ्यांसोबत वाद घातला. त्यांनी आपली अक्कल पाजळली. खरंतरं महाराष्ट्राला बेअक्कल कृषीमंत्री मिळाला आहे, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.
"शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता म्हणजे उपकार करता का?"; काँग्रेसचा सरकारला तिखट सवाल
कृषी विद्यापीठांची शेती का तोट्यात आहे?
"या मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली आणि आता म्हणत आहेत की कर्जमाफी झाली की तुम्ही सारखपुडा आणि लग्नाला खर्च करता. या मंत्र्यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार बँकेत पैसे देऊन माफ करणार आहे. ते पैसे शेतकऱ्यांच्या हातात देणार नाही. मुळामध्ये कृषीमंत्र्यांनी एकदा कृषी मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, असंही शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी म्हणाले, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे? याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र शिकावं. हमीभावापेक्षा कमी किंमतीत सोयाबीन विकायची वेळ आली आहे. कांद्याचे निर्यात शुल्क का कमी करत नाही हे केंद्राला विचारण्याची यांच्यात हिंमत नाही. तुमच्यात हिंमत नव्हती तर मग शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी देऊ, तुमचा सातराबा कोरा करतो, शेतकऱ्याला फसवून, गंडवून मतं का घेतली हे सांगा, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.