महाराष्ट्र हायस्कूल विजेते

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:04:02+5:302015-07-25T01:13:31+5:30

सुब्रतो मुखर्जी चषक : चौदा वर्षांखालील गटात ‘झेव्हिअर्स’चा पराभव

Maharashtra High School winners | महाराष्ट्र हायस्कूल विजेते

महाराष्ट्र हायस्कूल विजेते

कोल्हापूर : अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने सेंट झेव्हिअर्सचा ३-० असा पराभव करीत १४ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले; तर १७ वर्षांखालील गटात शाहू दयानंद हायस्कूल, शांतिनिकेतन, कोल्हापूर पब्लिक स्कूल यांनी पुढील फेरीत प्रवेश केला. रेसकोर्स येथील विभागीय क्रीडासंकुल येथे शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने प्रारंभापासून आक्रमक खेळ करीत सेंट झेव्हिअर्स संघावर दबाव निर्माण केला. महाराष्ट्रकडून हर्ष जरग, कुणाल चव्हाण, दिग्विजय सुतार यांनी प्रत्येकी एक गोल करीत सामना ३-० असा जिंकत चषकावर शिक्कामोर्तब केले.
विजयी संघात ओंकार चौगुले, हृषीकेश पाटील, यश इंजूळकर, सतेज साळोखे, कुणाल चव्हाण, ओंकार लायकर, हर्षवर्धन मोरे, विशाल पाटील, कौस्तुभ चौगुले, प्रेम देवेकर, दिग्विजय सुतार, विराज साळोखे, श्रेयस पाटील, ओंकार पाटील, अमन शेख, हर्ष जरग यांचा समावेश होता. १७ वर्षांखालील गटात पहिला सामना जवाहर इंग्लिश स्कूल विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल यांच्यात झाला. हा सामना ‘जवाहर’ने टायब्रेकरवर ३-१ ने जिंकला. दुसऱ्या सामन्यात नूतन मराठी विद्यालय हायस्कूलने वसंतराव चौगुले स्कूलचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात शाहू दयानंद हायस्कूलने डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा ३-१ असा टायब्रेकरवर पराभव केला. चौथ्या सामन्यात न्यू हायस्कूलने प्रबुद्ध भारत हायस्कूलचा १-० असा पराभव केला. यात विजयी गोल नीलेश शिंदे याने केला.
पाचव्या सामन्यात शिवाजी मराठा हायस्कूलने एस्तेर पॅटन हायस्कूलवर ४-० अशी एकतर्फी मात केली. ‘शिवाजी मराठा’कडून सौरभ खाबडेने दोन, तर आकाश हराळे, शिवराज जाधव यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. सहाव्या सामन्यात चाटे माध्यमिक स्कूलने साई इंग्लिश स्कूलचा ५-० असा धुव्वा उडविला. ‘चाटे’कडून दर्शन स्वामी, संकल्प थोरवत यांनी प्रत्येकी दोन गोल, तर मंगेश पोवार याने एक गोल केला. सातव्या सामन्यात भारती विद्यापीठने माईसाहेब बावडेकर प्रशालेचा २-१ असा पराभव केला. ‘बावडेकर’कडून ओंकार पाटीलने गोल केले.
आठव्या सामन्यात शांतिनिकेतनने पोदार इंटरनॅशनलवर २-० अशी मात केली. नवव्या सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कूलने माईसाहेब बावडेकर स्कूलवर २-० अशी मात केली.
अखेरच्या सामन्यात स. म. लोहिया हायस्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा १-० असा पराभव केला. (प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra High School winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.