महाराष्ट्र फौंडेशनचे पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: December 17, 2014 00:16 IST2014-12-17T00:10:52+5:302014-12-17T00:16:06+5:30

पुण्यात होणार वितरण : किरण गुरव, हिंमाशू स्मार्त, श्याम मनोहर, पुष्पा भावे मानकरी

Maharashtra Foundation Awards | महाराष्ट्र फौंडेशनचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र फौंडेशनचे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर/ सातारा : अमेरिकास्थित महाराष्ट्र फौंडेशनचे ‘साहित्य’ आणि ‘समाजकार्य’ पुरस्कार जाहीर झाले असून, ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार पुणे येथील श्याम मनोहर, तर ‘समाजकार्य’ पुरस्कार मुंबई येथील पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारांसमवेत अन्य पुरस्कारांचीही घोषणा झाली असून, याचे वितरण १० जानेवारी २०१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात होणार आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस
डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सातारा येथे व ‘साधना’चे सहयोगी संपादक प्रा. राजा शिरगुप्पे यांनी आजरा येथे या पुरस्काराची घोषणा केली. हे पुरस्कार अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फौंडेशनतर्फे देण्यात येत असले, तरी त्याचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्ट करते.
साहित्य पुरस्कारामध्ये ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ गोव्याच्या महाबळेश्वर सैल यांना ‘तांडव’ कादंबरीसाठी, ‘अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार’ मुंबईच्या अरुण खोपकर यांना ‘चित्रव्यूह’ व ‘चलत् चित्रव्यूह’ या जोड पुस्तकांसाठी, ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ कोल्हापूरच्या किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या पुस्तकासाठी, तर ‘रा. शं. दातार नाट्यपुरस्कार’ कोल्हापूरच्याच हिमांशू स्मार्त यांना ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाट्यलेखनासाठी जाहीर झाला आहे. या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहे. समाजकार्य पुरस्कार पाचजणांना जाहीर झाला आहे.
‘सामाजिक प्रश्न’ विभागात देण्यात येणारा कार्यकर्ता पुरस्कार बिंदुमाधव खिरे (पुणे), तर ‘असंघटित कष्टकरी’ या विभागातील कार्यकर्ता पुरस्कार मनीषा तोकले (बीड) यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे. (प्रतिनिधी)

वागळेंना डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ निखिल वागळे (मुबंई) यांना जाहीर झाला असून, त्याचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
‘प्रबोधन’ विभागात देण्यात येणारा कार्यकर्ता पुरस्कार रमेश गावस (गोवा) यांना जाहीर झालेला आहे.



हा पुरस्कार मला मिळाला यापेक्षा कथा या प्रकाराला मिळाला, या गोष्टीचा जास्त आनंद आहे़ राधानगरीसारख्या दुर्गम भागातील कष्टकऱ्यांच्या बोलीभाषेचा आधार असलेल्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहाला मिळालेला पुरस्कार कथा लेखकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आहे़ - किरण गुरव



नाटकाच्या माध्यमातून भविष्यातील समस्यांचा वेध घेण्याचा माझा प्रयत्न असतो़ ‘जत्रेतलं जायंट व्हील’मध्येही आधुनिक जीवनात भान हरपलेल्या आणि एकमेकांशिवाय जगू पाहणाऱ्या दाम्पत्याच्या माध्यमातून जीवनशैलीवर प्रकाश टाकला आहे. या पुरस्कारामुळे या प्रयत्नाला दाद मिळाल्याचा आनंद विलक्षण आहे़
नाटकाच्या माध्यमातून भविष्यातील समस्यांचा वेध घेण्याचा माझा प्रयत्न असतो़ ‘जत्रेतलं जायंट व्हील’मध्येही आधुनिक जीवनात भान हरपलेल्या आणि एकमेकांशिवाय जगू पाहणाऱ्या दाम्पत्याच्या माध्यमातून जीवनशैलीवर प्रकाश टाकला आहे. या पुरस्कारामुळे या प्रयत्नाला दाद मिळाल्याचा आनंद विलक्षण आहे़
-हिमांशू स्मार्त

Web Title: Maharashtra Foundation Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.