वारणा व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर असलेल्या सरूड गावाला महापुराने चारही बाजूंनी वेढा टाकला असून सरूड गाव महापुराच्या विळख्यात सापडले आहे. सरूडपैकी खामकरवाडी व डाकवेवाडी येथे कडवी नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने येथील सुमारे ५० हून कुटुंबीयांचे व त्यांच्या जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरपातळीत वाढ होत असल्याने सरूड परिसरातील पूरपरिस्थिती गंभीर बनली असून या परिसरात वारणा व कडवी या दोन्ही नद्यांच्या महापुराने रौद्ररूप धारण केले आहे. दरम्यान वडगावमध्येही वारणा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने येथील सुमारे वीस कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चांदोली (वारणा) व कडवी या दोन्ही धरणांतून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात केलेल्या विसर्गामुळे शुक्रवारी वारणा व कडवी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. वारणा नदीच्या पुराचे पाणी सागांव व वडगाव रस्त्यावर तर कडवी नदीच्या पुराचे पाणी बांबवडे व शिंपे या मार्गावर आल्याने सरूड गावातून बाहेर पडणारे चारही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, सरूड गावचा इतर गावांशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. सरूडगावच्या पूर्वेला असणाऱ्या बिरदेव माळ व खामकरवाडीलाही पुराच्या पाण्याने वेढा टाकला आहे. या परिसराचा सरूडशी संपर्क तुटला आहे. येथील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.