आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीस महामस्तकाभिषेक
By Admin | Updated: May 11, 2015 01:07 IST2015-05-11T01:04:57+5:302015-05-11T01:07:23+5:30
मंगलमय सोहळा : लक्ष्मीसेन महाराजांचा गौरव; ‘अहिंसा परमो धर्म की जय’चा घोष

आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीस महामस्तकाभिषेक
कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठाच्या विशाल प्रांगणात स्थित अमृतशिलेतील प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या २८ फूट उंच बृहन्मूर्तीचा ५४ वा वार्षिक पंचामृत महामस्तकाभिषेक मांगल्यपूर्ण वातावरणात, सवाद्य व विधिवत पद्धतीने रविवारी सायंकाळी संपन्न झाला. ‘भगवान आदिनाथ की जय...’, ‘जैन धर्म की, विश्वधर्म की जय...’, ‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘जैनं जयतू शासनम्...’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.
आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक समितीतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता आदिनाथ तीर्थंकरांच्या पंचामृत महामस्तकाभिषेकास सुरुवात झाली. कोल्हापूर व जिनकंचीचे मठाधिपती परमपूज्य लक्ष्मीसेन महास्वामी, नांदणी पीठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेवक सत्यजित कदम, आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचे देणगीदार कासळीवाळ कुटुंबीयांचे प्रतिनिधी पारसकुमार व गुणमाला पांड्या यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम ११ सुवर्णकलशांचा भगवंतांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आदिनाथांच्या पायांजवळ विधिवत पूजा झाली. त्यामध्ये खोबऱ्यांचा खीस, हरभरा डाळ, साखर, गूळ, तूप, दूध, आमरसांनी पाद्यपूजा झाली. त्यानंतर विशेष द्रव्यपूजा आदिनाथांच्या मूर्तीवर कलशाभिषेकाने झाली.
त्यामध्ये इक्षू अर्थात उसाचा रस, दुग्धाभिषेक, कलकचूर्ण, कषायचूर्ण, कुंकूम, हळदाभिषेक, सर्वाेषधी, अष्टगंध, चतु:षकोन, पुष्पवृष्टी, शांतीकलश मंत्रोच्चार झाल्यानंतर मंगल आरती होऊन महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. शहरातील सर्वच मंदिरांचे विश्वस्त तसेच श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी एकूणच वातावरण मंगलमय झाले होते.
या महोत्सवासाठी परमपूज्य लक्ष्मीसेन महास्वामी यांचे मार्गदर्शनाखाली पद्माकर कापसे, राजू उपाध्ये, धन्यकुमार जैन, अभय भिवटे, वसंत आडके, अजित सांगावे आदींनी संयोजन केले. यावेळी जैन धर्मातील श्रावक, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सर्व मंदिरांचे विश्वस्त, पंडितगण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)