महालक्ष्मी यात्रेची उद्यापासून सुरूवात
By Admin | Updated: May 4, 2015 00:55 IST2015-05-04T00:55:44+5:302015-05-04T00:55:44+5:30
गडहिंग्लजमध्ये भक्तिमय वातावरण : तीन दिवस चालणार ; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

महालक्ष्मी यात्रेची उद्यापासून सुरूवात
गडहिंग्लज : अमाप उत्साहात शनिवारपासून येथील श्री महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली असून ५ ते ७ मे हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत. त्यासाठी नागरिकांसह यात्रा कमिटी आणि प्रशासन व्यवस्था सज्ज झाली आहे.
यात्रेसाठी गडहिंग्लज तालुक्यासह सभोवतालच्या आजरा, चंदगड, भुदरगड, कागल व कर्नाटकातील सीमाभागातून खासगी, दुचाकी व चारचाकी वाहनाने अंदाजे ८ ते १० लाख भाविक येतील, असा यात्रा कमिटीसह प्रशासनाचा अंदाज आहे. शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊन नागरिक व पादचारी यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहराबाहेर पार्किंगसह शहरातील मार्ग आवश्यकतेनुसार एकेरी, तर काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद केले आहेत, तर बंदोबस्तासाठी शीघ्र कृती दल, वाहतूक शाखेच्या पोलिसांसह अन्य पोलिसांची जादा कुमक असेल.
संकेश्वर ते आजरा रस्त्यावर हॉटेल साई प्लाझा ते चर्चरोडपर्यंत एकेरी वाहतूक. मुसळे कॉर्नर ते हॉटेल साई प्लाझापर्यंत एस.टी.करिता दुहेरी वाहतूक. वडरगे रोडवर मुसळे कॉर्नर ते टेलिफोन एक्स्चेंजपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद. कडगाव रोड शासकीय विश्रामगृह ते मुसळे कॉर्नर एकेरी वाहतूक. चर्च रोड आजरा रोड कॉर्नर ते भगवा चौक कडगाव रोडपर्यंत एकेरी वाहतूक. भडगाव रोडवर दसरा चौक ते संजीवनी हॉस्पिटलपर्यंत दुहेरी वाहतूक. आजरा रोड राधाकृष्ण मंदिरापासून भडगाव रोड हॉटेल यशोनंदापर्यंत रिगरोडवर एकेरी वाहतूक. भडगाव रोड संजीवनी हॉस्पिटल ते अयोध्यानगर बसथांब्यापर्यंत एकेरी वाहतूक. संकेश्वर रोड हॉटेल साईप्लाझा ते मराठा चित्रमंदिर भडगाव रोड रिंगरोड वरून एकेरी वाहतूक. वीरशैव चौक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते शिवाजी चौक, नेहरू चौक ते रंजनीगंधा चौक सर्व प्रकारचे वाहनांस प्रवेश बंद. भडगाव रोड शिवसागर हॉटेल ते देसाई हॉस्पिटल आणि तारा नर्सिंग होम, देसाई हॉस्पिटल ते आर्या किराणा दुकान कुंभार गल्लीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी आहे. दरम्यान, यात्राकाळात प्लास्टिक द्रोण, पत्रावळ्या, आदींचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तो इतरत्र पसरू नये यासाठी नगरपरिषदेतर्फे वाटण्यात आलेल्या कॅरीबॅगचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)