‘महालक्ष्मी’चे स्वप्न अपुरेच
By Admin | Updated: March 12, 2015 00:44 IST2015-03-12T00:42:10+5:302015-03-12T00:44:58+5:30
सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारातही काम केले. केवळ महालक्ष्मी दूध संघाचे गालबोट त्यांना लागले, ही सल त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली.

‘महालक्ष्मी’चे स्वप्न अपुरेच
राजाराम लोंढे- कोल्हापूर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी संघर्षातून राजकारणातील सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली. सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारातही काम केले. केवळ महालक्ष्मी दूध संघाचे गालबोट त्यांना लागले, ही सल त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. शेतकऱ्यांनी आपल्याकडे बघून पैसे दिलेत, त्यांचा विश्वासघात करणार नाही, दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; पण त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले.
सदाशिवराव मंडलिक यांचे राजकीय जीवन आगामी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. राजकीय पाठबळ व घराणेशाही असेल तरच राजकारण करता येते, या सगळ्याला छेद देत मंडलिक यांनी आपली राजकीय कारकिर्द उभी केली. हे कोणालाही जमणार नाही. त्यासाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपली उभी हयात खर्ची घालावी लागते. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उभा करण्याचे काम मंडलिक यांनी केले. १९६० साली शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कागल तालुक्यात विकास सेवा संस्था, दूध व पतसंस्थांचे जाळे विणले. कार्यकर्त्यांना संस्था काढून देत असताना त्याकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सामान्य माणसाची नाळ या संस्थांशी जोडली असल्याने संस्थांकडे त्यांचे लक्ष असायचे.
राजकीय संघर्ष करीत असताना त्यांनी संस्थात्मक पातळीवर कधीही तडजोड केली नाही. कागल तालुक्यातील ‘शाहू’, ‘बिद्री’ हे दोन सक्षम कारखाने असताना हमीदवाडासारख्या फोंड्या माळावर त्यांनी साखर कारखाना काढण्याचे धाडस केले. त्यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे कारखाना चालविल्याने आज राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये ‘हमीदवाडा’ कारखान्याचे नाव घेतले जाते. जिल्ह्णातील दुधाचे उत्पादन पाहून त्यांनी महालक्ष्मी दूध संघाची स्थापना केली. हा संघ स्थापन करतानाही त्यांच्या वाटणीला मोठा संघर्ष आला. त्यातून दूध संघाची उभारणी केली. वाढते वय व खासदारकी यामुळे मंडलिक यांनी दूध संघाच्या कामकाजातील लक्ष कमी केले. याच काळात मंडलिक-मुश्रीफ गटांतील अंतर्गत संघर्ष खदखदू लागला. दूध संकलन कमी आणि प्रकल्पाचा खर्च वाढत गेल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडला आणि बंद पडला. ही सल मंडलिक यांच्या मनात कायम राहिली.
सामान्यांचे पैसे अडकल्याची सल शेवटपर्यंत
राज्यात व केंद्रात शिवसेना, भाजपचे सरकार आहे. संघाचे अध्यक्ष संजय मंडलिक यांचे पक्षात चांगले वजन आहे. त्याचा उपयोग करून सरकारकडून आर्थिक मदत घेऊन संघाला गतवैभव मिळवून देऊन सदाशिवराव मंडलिक यांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी कागल तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे.