महाकालीचा ‘कौल’ फुलेवाडीला
By Admin | Updated: March 9, 2015 23:46 IST2015-03-09T23:25:05+5:302015-03-09T23:46:09+5:30
टायब्रेकरमध्ये ‘पीटीएम’वर मात : निखिल खाडे याला ‘मालिकावीर’चा बहुमान

महाकालीचा ‘कौल’ फुलेवाडीला
कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ(अ)चा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करत महाकाली चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे याची निवड करण्यात आली.शाहू स्टेडियम येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांतील खेळाडूंना अचूक फिनिशिंग करता न आल्याने पूर्वार्धात गोल करता आले नाहीत. ‘पाटाकडील’कडून रूपेश सुर्वे, उत्सव मरळकर, हृषीकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे यांनी गोल करण्यासाठी जंग-जंग पछाडले. मात्र, फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने ‘उत्कृष्ट गोलरक्षण’ करत त्यांचे गोल करण्याचे इरादे फोल ठरविले. ‘फुलेवाडी’कडून मोहित मंडलिक, सूरज शिंगटे, तेजस जाधव, मोहसिन बागवान, रौनक कांबळे, अजित पोवार यांनी चांगला खेळ केला. ५५ व्या मिनिटास ‘फुलेवाडी’कडून मिळालेल्या संधीवर रौनक कांबळे याने गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एक गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पाटाकडील संघाने खेळात बदल करत आक्रमक व वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. त्यात तीन मिनिटांत फुलेवाडी विरुद्ध पाच कॉर्नर किक पाटाकडील संघास मिळाल्या. गोल होणार असे वाटत असतानाच फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडेने किमान सहा फटके अत्यंत चपळाईने झेपावत गोलपोस्ट बाहेर काढले. ६३ व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून अक्षय मेथे-पाटीलने उजव्या बगलेतून दिलेल्या पासवर प्रशांत नार्वेकर याने अचूक गोल करत १-१ अशी बरोबरी केली. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर ‘पाटाकडील’ने खेळात अत्यंत आक्रमकपणा आणला. मात्र, प्रत्येक चढाई फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने तितक्याच चपळाईने निष्प्रभ ठरविल्या. संपूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यात फुलेवाडी संघाने ४-३ असा ‘पाटाकडील’चा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ‘पाटाकडील’कडून सैफ हकिम, अक्षय मेथे पाटील, नियाज पटेल यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून रोहित साठे, तेजस जाधव, अजित पोवार, निखिल खाडे यांनी गोल केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ छत्रपती मधुरिमाराजे, विशाल सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी विकास साळोखे, संभाजी जाधव, शिवाजी पाटील, माणिक मंडलिक, बबनराव कोराणे, अजित खराडे, विजय साळोखे आदी उपस्थित होते.