महागोंडच्या महिलेने नाकारली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:27+5:302021-01-13T05:05:27+5:30
उत्तूर : महागोंड (ता. आजरा) येथील श्रीमती रंगुबाई आनंदा पाटील यांनी घरामध्ये वीज वापरण्याबाबत नकार दिला. रंगुबाई या अंधाऱ्या ...

महागोंडच्या महिलेने नाकारली वीज
उत्तूर : महागोंड (ता. आजरा) येथील श्रीमती रंगुबाई आनंदा पाटील यांनी घरामध्ये वीज वापरण्याबाबत नकार दिला. रंगुबाई या अंधाऱ्या खोलीत एकट्याच राहत असल्याची माहिती सोशल मीडियातर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कळाली अन् रंगुबाईंच्या घरात लख्ख प्रकाश आला.
महागोंड गावातील ही महिला रंगुबाई पाटील अंधाऱ्या खोलीत राहत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. तिने वीज वितरण कंपनीची वीज नाकारली. दहा बाय दहाच्या खोलीत रंगुबाई या चार-पाच शेळ्यांसह एकट्याच राहायच्या. याबाबत ऊर्जामंत्री यांना ही व्हायरल बातमी कळताच त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीला उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार महावितरण कार्यकारी अभियंता गडहिंग्लज संजय पवार, उपकार्यकारी अभियंता आजरा कमतगी, कनिष्ठ अभियंता गुरव, ग्रामसेवक दोरुगडे, बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सौरदिवा बसवून रंगुबाईंच्या घरी प्रकाश आणला.
---------------------
* अनवाणी चालणाऱ्या रंगुबाई
वयाच्या ६९ व्या वर्षी रंगुबाई लेकीकडे, माहेरी व बाजारहाटासाठी अनवाणी चालत जातात. आतापर्यंत त्यांनी अनवाणीच प्रवास केला आहे. त्या कोणत्याही वाहनात बसल्या नाहीत. आपल्याला वीज नको, असे ठामपणे सांगणाऱ्या रंगुबाईना सौरऊर्जा मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
-------------------------
फोटो ओळी :
महागोंड (ता. आजरा) येथे रंगुबाई पाटील यांना सौरऊर्जेचे साधन देताना महावितरणचे अधिकारी.
क्रमांक : १२०१२०२१-गड-११