कोल्हापूर : शहरवासीयांसह परगावचे भाविक, पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या महाद्वार रोड, ताराबाई रोड अतिक्रमणाने व्यापला आहे. फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, रस्त्याच्या कडेचे रिक्षा स्टॉप, अनधिकृत केबिन्स, अस्ताव्यस्त पार्किंगचे या कारणांनी नागरिकांना मूळ रस्ता शोधावा लागत आहे. पर्यटकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागकाडून अधूनमधून या रोडवर कारवाई केली जाते. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी परत जैसे थे स्थिती अनुभवयाला मिळते. फेरीवाल्यांनी रस्त्यावर मांडलेले ठाण आणि रिक्षा स्टॉपमुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी होत आहे. गर्दीतून वाहन चालविताना त्यांना कसरत करावी लागत असताना पादचाऱ्यांना तर जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे.शहरातील प्रमुख रस्ते म्हणून महाद्वार आणि ताराबाई रस्त्याची ओळख आहे. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक पर्यटकांना महाद्वारचे आकर्षण आहे. स्थानिक नागरिकांची या रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे महाद्वार, ताराबाई आणि जोतिबा रोडवर नागरिकांची गर्दी कायम असते. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या दुप्पट वाढते.महाद्वार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या आहे. हातगाडीवर कपडे विकणारे, सौंदर्यप्रसाधने विकणारे, स्टॉल लावणारे, विविध किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा होतो. नागरिकांना चालताही येत नाही, असे चित्र या मार्गावर आहे.
रस्त्यातच रिक्षाजोतिबा रोड कॉर्नर महाद्वार रोडवर अनधिकृत रिक्षा थांबतात. खरेदीसाठी येणाऱ्यांची वाहने थेट रस्त्यावर करून लावली जातात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.
रस्ता शोधावा लागतोकपिलतीर्थ मार्केटचे प्रवेशद्वार व महाद्वार चौक या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ताही मिळत नाही. वाहनांची गर्दी व अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना येथून जाताना अक्षरशः घाम फुटतो. नागरिकांना रस्ता शोधावा लागतो.
महाद्वारचा कलेक्टर कोण ?महाद्वार, जोतिबा आणि ताराबाई रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हप्ता घेणारा एक कलेक्टर आहे. त्याचे अनेक विक्रेत्यांना अभय आहे. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी कारवाईसाठी गेल्यानंतर त्याचा फोन संबधितांना जातो. त्यामुळे कारवाईपासून अभय मिळत असल्याची चर्चा आहे.
काही फेरीवाल्यांकडून हप्ताकाही दुकानधारक दुकानासमोर उभे राहणाऱ्या विक्रेत्यांकडून दररोज ३०० ते ५०० रुपयांचा हप्ता घेत असल्याचा आरोप काही विक्रेत्यांकडून होत आहे.
प्रमुख रस्त्यावर वाहतुकीला कोणतीही शिस्त नाही. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सातत्याने कारवाईची गरज आहे. - संदीप साळोखे, नागरिक