टँकर बंदच्या भीतीनेच महाडिक यांचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:58+5:302021-04-18T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील पराभवानंतर टँकर बंद होण्याच्या भीतीपोटीच माजी खासदार धनंजय महाडिक हे बेताल ...

टँकर बंदच्या भीतीनेच महाडिक यांचे वक्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील पराभवानंतर टँकर बंद होण्याच्या भीतीपोटीच माजी खासदार धनंजय महाडिक हे बेताल वक्तव्य करत असल्याचा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. पराभव समोर दिसू लागल्यानेच महाडिक कुटुंब अस्वस्थ झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्री पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये महाडिकांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच महाडिक यांचे घरदार जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या दारात जाऊन मतासाठी पाया पडत आहे. ‘गोकुळ’मधील पराभव त्यांना समोर दिसत असल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. टँकरचा व्यवसाय बंद होऊन आर्थिक कमाई बंद होण्याची भीती त्यांना आहे.
‘गोकुळ’चे ठरावधारक असणारे डोणोली येथील सुभाष पाटील हे जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत शाखाधिकारी होते आणि त्यांनी शेवटपर्यंत ग्राहकांना चांगली सेवा दिली. सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू दूर्देवी आहे. पण त्यांच्याबद्दल बोलणारे महाडिक यांनी कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्यावर सांत्वनाचे दोन शब्ददेखील बोलल्याचे जिल्ह्यात कोणाला आठवत नाही. ‘गोकुळ’च्या प्रेमापोटीच ते सुभाष पाटील यांच्याबद्दल आता बोलले आहेत. पालकमंत्री म्हणून मी सुभाष पाटील यांचे कुटुंब तसेच जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांच्या कुटुंबांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो.
‘रेमडेसिविर’साठी तुम्ही काय केले?
डोणोली येथील ठरावधारकाच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा त्यांनी भाजपचे प्रवक्ते म्हणून केंद्र सरकारकडून रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काय प्रयत्न केले, अशी विचारणा मंत्री पाटील यांनी पत्रकातून केली.