महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये राजकीय फंडे चालवू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:12+5:302021-09-26T04:27:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाला ९५ कोटींचा तोटा झाल्याची वल्गना करणाऱ्यांनी अगोदर दूध व्यवसायाची माहिती घ्यावी. ...

Mahadikas should not run political funds in Gokul | महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये राजकीय फंडे चालवू नयेत

महाडिकांनी ‘गोकुळ’मध्ये राजकीय फंडे चालवू नयेत

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाला ९५ कोटींचा तोटा झाल्याची वल्गना करणाऱ्यांनी अगोदर दूध व्यवसायाची माहिती घ्यावी. गेल्या चार महिन्यांत तोटा नव्हे, तर १ कोटी ९५ लाखांचा नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. वैयक्तिक द्वेषातून लाखो दूध उत्पादकांचे संसार उभे असलेल्या संघावर आरोप करणाऱ्यांच्या मनात काय आहे, हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे महाडिकांनी येथे राजकीय फंडे चालवू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.

अध्यक्ष पाटील म्हणाले, मुंबई येथे ‘इग्लू’ कंपनीने पॅकिंग बंद केले, त्यानंतर महानंदकडून पॅकिंग करून घेतल्याने संघाचा १९ पैशांचा फायदा झाला. पुण्यातील पॅकिंगचा ठेका रद्द करण्याचा निर्णय राजकीय आकसातून नाही, तर कोल्हापूरमधून पॅकिंग करून वाहनातून दूध वितरण केले तर प्रतिलिटर २५ पैसे बचत होणार आहे. परजिल्ह्यातील दूध खरेदीतून प्रतिलिटर ३ रुपये ७९ पैशांचा संघास फायदा होतो. संघावर केवळ ३१ कोटी ६४ लाखांचे कर्ज असून, त्याची परतफेड नियोजनबद्ध सुरू आहे. यावेळी संचालक अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, प्रा. किसन चौगले, अजित नरके, अंजना रेडेकर, अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, बोर्ड सचिव एस. एम. पाटील उपस्थित होते.

‘रोजंदारी’ कमी केल्यानेच ३.९० कोटींची बचत

रोजंदारी १८० कर्मचाऱ्यांना कमी केल्याने त्यांच्या पगारापोटी होणारी वार्षिक ३ कोटी ९० लाखांची बचत झाली. एखाद्याला जादा वेळ कामावर थांबावे लागले तरी त्याला जादा मोबदला न देता पर्यायी सुटी दिली जाते, त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा भार नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

खरी पुण्याई शेतकरी, ग्राहकांची

‘गोकुळ’ आर्थिक परिस्थिती भक्कम होण्यास ३० वर्षांचा कारभार असला तरी खरी पुण्याई ही पाच लाख दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक व कर्मचाऱ्यांची असल्याचा टोला विश्वास पाटील यांनी लगावला.

मग ‘राजाराम’ची सभा ऑनलाइन कशी

शासनाच्या आदेशानुसारच ‘गोकुळ’ची सभा ऑनलाइन घेतली. मात्र, ज्यांना ही सभा ऑफलाइन घ्यावी असे वाटत होते, तर राजाराम साखर कारखान्याची ऑनलाइन सभा कशी? अशी विचारणा अध्यक्ष पाटील यांनी केली.

...तर त्यांची कुरियन पुरस्कारासाठी शिफारस करू

‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या मालकीचा संघ आहे. वैयक्तिक द्वेषातून खोट्या माहितीच्या आधारे कोणी दिशाभूल करू नये. यापुढे अशा वक्तव्यावर उत्तर देणार नाही. मात्र, महिला संचालकांना चार महिन्यांतच संघाच्या कामकाजाचा अभ्यास खूप झाल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना ‘डॉ. वर्गीस कुरियन’ पुरस्कारासाठी संघातर्फे शिफारस करू, असा उपहासात्मक टोला अध्यक्ष पाटील यांनी लगावला.

Web Title: Mahadikas should not run political funds in Gokul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.