महाडिक सोडून येईल त्याला बरोबर घेणार

By Admin | Updated: January 14, 2015 01:24 IST2015-01-14T01:19:23+5:302015-01-14T01:24:40+5:30

सतेज पाटील : सत्ता द्या; प्रतिलिटर दीड रुपयांचा फरक दिसेल; ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे फुंकले रणशिंग

Mahadik will leave him and take him with him | महाडिक सोडून येईल त्याला बरोबर घेणार

महाडिक सोडून येईल त्याला बरोबर घेणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादकांना न्याय देण्यासाठी महाडिकांना सोडून जी मंडळी येतील त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करणार असल्याचे सांगत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ निवडणुकीचे रणशिंग आज फुंकले. सत्ता दिली, तर कारभार कसा करायचा, हे दाखवून देत लिटरला दीड रुपये जादा दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
वॉटर पार्क येथे सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’च्या कारभारावर तोंडसुख घेतले. ‘गोकुळ’वर सामान्य माणसांचा संसार उभा आहे, जिल्हा बॅँकेप्रमाणे ‘गोकुळ’ची अवस्था होऊ देऊ नका, असे पी. डी. पाटील यांनी सांगितले. दूध उत्पादकांच्या तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संघातील कारभाराबाबत कमालीची चीड आहे. तेथील एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी पुढाकार घ्या, सारा जिल्हा आपल्या पाठीशी उभा राहील, असे किरणसिंह पाटील यांनी सांगितले. गडहिंग्लजमधून दीडशे ठराव तुमच्या पाठीशी उभा करतो, जिल्ह्यातील इतर नेत्यांना विश्वासात घेऊन मोट बांधा, परिवर्तन अटळ असल्याचे बी. एम. पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’ बापाची मालमत्ता असल्यासारखा कारभार सुरू आहे, या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्या, अशी विनंती विश्वास नेजदार यांनी केली.
कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर बोलताना सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात विकासकामांच्या माध्यमातून स्वतंत्र गट तयार झाला आहे, या गटाच्या माध्यमातून आगामी ‘गोकुळ’, जिल्हा बॅँक, बाजार समिती निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. ‘गोकुळ’च्या उभारणीत स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे योगदान मोठे असून, त्यांच्यामुळेच देशात संघाचा नावलौकीक वाढला. सत्तारूढ गटाबद्दल असंतोष खदखदत आहे, पण पुढाकार घ्यायचा कोणी? असा प्रश्न असल्याने बंटी पाटलांकडे वैरत्व अंगावर घेण्याची धमक असल्याने पुढाकार घ्यावा, असा जिल्ह्णातील नेत्यांचा आग्रह आहे. सामान्य दूध उत्पादकांच्या भल्यासाठी पुढाकार घेणार असून ठराव ताकदीने गोळा करा, पुढील आडाखे कसे बांधायचे? हे लवकरच ठरवले जाईल. महाडिक सोडून जे येतील त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल, यामध्ये माझ्या घरातील कोणी असणार नाहीत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.


‘पी.एन.’चे कार्यकर्ते नरकेंना मतदान करणार कसे ?
जिल्ह्यातील नेत्यांचे राजकारणच समजत नाही, आता पी. एन. पाटील यांचे कार्यकर्ते अरुण नरकेंना मतदान करणार का? संजय घाटगे, रणजित पाटील यांना मतदान करणार का? हे समजत नाही, सत्तेसाठी सगळी भांडणे मिटतात कशी? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

विनाटेंडर टॅँकर कसे?
‘गोकुळ’च्या कारभारावर आता बोलणार नाही, पाच वर्षांचे आॅडिट रिपोर्ट माझ्या हातात आहेत, विनाटेंडर टॅँकरचे ठेके कोणाला दिले, तूप एकाच डेअरीला कसे? वासाचे काढलेले दूध कोणाच्या डेअरीला जाते, रांगोळीसह अवास्तव खर्चाचा पोलखोल केला जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.


लोकसभेची चूक
पुन्हा नाही
ठराव ताकदीने गोळा करा, लोकसभेसारखी चूक पुन्हा करणार नाही. ‘गोकुळ’ची लढाई करायची नक्की, निकालापेक्षा लढाई महत्त्वाची असल्याचे पाटील यांनी सांगितले.


‘त्यांना’ कोठे पक्षाचे बंधन?
मंत्री, आमदार असताना पक्षाचे बंधन आपल्यावर होते, आता ते राहणार नाही ज्या पक्षाचे नेते बरोबर येतील त्यांना घेऊन लढाई करणार आहे. महाडिक स्वत: काँग्रेसमध्ये, मुलगा भाजपचा आमदार, तर पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार आहेत, मग आम्ही सोयीचे राजकारण केले तर बिघडले कोठे? असा टोला पाटील यांनी हाणला.

Web Title: Mahadik will leave him and take him with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.