उमेदवारीत डच्चू मिळालेले महाडिक एकमेव
By Admin | Updated: December 10, 2015 01:28 IST2015-12-10T01:18:26+5:302015-12-10T01:28:26+5:30
राज्यातील चित्र : आठ जागांवर लढती; सहा जागांवर आघाडीची विद्यमानांनाच उमेदवारी

उमेदवारीत डच्चू मिळालेले महाडिक एकमेव
विश्वास पाटील--कोल्हापूर --जानेवारीत मुदत संपणाऱ्या विधान परिषदेच्या राज्यातील आठ जागांची निवडणूक होत आहे; परंतु त्या आठपैकी पक्षाने उमेदवारी डावलेले आमदार महादेवराव महाडिक हे एकमेव आहेत. अन्य सात ठिकाणी त्या-त्या पक्षांनी विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे. नागपूर मतदार संघातूनही काँग्रेसचा उमेदवार बदलला आहे; परंतु तिथे मावळते आमदार राजेंद्र मुळक यांनी स्वत:हूनच आपल्याला उमेदवारी नको, असे स्पष्ट केले होते.
राज्यात मुंबईच्या दोन, सोलापूर, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलडाणा, अहमदनगर आणि नागपूर या विधान परिषदांच्या जागांची मुदत १ जानेवारी २०१६ ला संपत आहे. त्यातील आठपैकी सात जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काँग्रेस मुंबईतील एक, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार आणि नागपूर या जागा लढवत आहे. मुंबईतील एक जागा दोन्ही पक्षांनी सोडली आहे. काँग्रेसने मुंबईतून आमदार भाई जगताप यांना पुन्हा संधी दिली. धुळे-नंदूरबारमधून अमरिष पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. कोल्हापुरात मात्र विद्यमान आमदार महाडिक यांचा पत्ता ‘कट’ करून त्यांच्याऐवजी पक्षाने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर विश्वास दाखविला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन जागा आल्या असून त्यावर सोलापुरातून पक्षाने दीपकराव साळुंखे यांना, अहमदनगरमधून अरुणकाका जगताप या विद्यमान सदस्यांना संधी दिली. पक्षाने अकोला-बुलडाण्यातून रवींद्र सपकाळ या नव्या कार्यकर्त्यास संधी दिली आहे.
आठ जागांवर भाजपचा एकही विद्यमान आमदार नाही. या पक्षाने नागपूरमधून गिरीष व्यास यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडे मुंबईतील एक व अकोला-बुलडाण्याची जागा होती. तिथे अनुक्रमे पर्यावरणमंत्री रामदास कदम व आमदार गोपीकिसन बजोरिया यांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली.
मर्यादित मते असलेल्या मतदार संघांत विद्यमान आमदारांची पकड असते. त्यांना धक्का देणे शक्य नसते म्हणून पक्षही सहसा उमेदवार बदलण्यात राजी नसतात परंतु कोल्हापुरात मात्र हे घडले आहे. दिल्लीसह मुंबईतील नेतृत्वाशी असलेले संबंध, निवडून येण्याची क्षमता, राजकीय व आर्थिक ताकद आणि तरुण नेतृत्व या निकषांवर सतेज पाटील यांनी उमेदवारी पटकावली आहे.