अंबरिशना वगळण्यास महाडिक यांचा नकार

By Admin | Updated: April 7, 2015 01:20 IST2015-04-07T01:10:04+5:302015-04-07T01:20:47+5:30

‘गोकुळ’चे राजकारण : मुश्रीफ-महाडिक यांची भेट; अंतिम निर्णय बुधवारी होणार

Mahadik denied to boycott Ambarrica | अंबरिशना वगळण्यास महाडिक यांचा नकार

अंबरिशना वगळण्यास महाडिक यांचा नकार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत सत्तारूढ पॅनेलमधून माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश यांना वगळण्यास आमदार महादेवराव महाडिक यांनी अप्रत्यक्षरित्या नकार दिला. याबाबत सोमवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी आमदार महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांची बैठक झाली; पण निर्णय होऊ शकला नाही.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जागा द्याव्यात, अशी मागणी आमदार मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाकडे केली आहे. त्याचबरोबर अंबरिश घाटगे यांना पॅनेलमध्ये घेऊ नये, असा प्रस्तावही त्यांनी सत्तारूढ गटाकडे ठेवला आहे; पण घाटगे यांना बाजूला करण्यास पी. एन. पाटील यांचा विरोध असल्याने पेच निर्माण झाला आहे. गेले आठ दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी खासदार महाडिक यांच्या घरी आमदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात बैठक झाली. बैठकीतील तपशील समजू शकला नसला तरी अंबरिश घाटगे यांच्या जागेचा मुद्दाच कळीचा बनल्याचे समजते. कागल तालुक्यातून आता संघामध्ये माजी आमदार संजय घाटगे यांच्या पत्नी अनुराधा घाटगे या संचालक आहेत. त्यांच्याऐवजी अंबरिश यांना पॅनेलमध्ये संधी मिळावी, असा संजय घाटगे यांचा प्रयत्न आहे तर त्यास मुश्रीफ यांचा विरोध आहे. सत्तारूढ गटातून त्यांचा पत्ता कापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व ताकद पणाला लावली आहे. यासाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांवर दबावाचे राजकारणही सुरू केले आहे; पण आमदार महाडिक यांची गोची झाल्याने त्यांनी कोणताही ‘शब्द’ आमदार मुश्रीफ यांना या बैठकीत दिला नसल्याचे समजते. बैठकीत याच एका मुद्द्यावर चर्चा
झाली. त्यावर महडिक यांनी असे सांगितले की, घाटगे यांना उमेदवारी देण्याचा विषय हा पी. एन. पाटील यांच्याशी संबंधित आहे. अंबरिश यांना पॅनेलमध्ये घेण्यासंदर्भात पी. एन. यांचा आग्रह आहे. त्यामुळे अंबरिश यांना वगळायचे असल्यास तुम्ही हा विषय पी. एन. यांच्याशी बोलावा.
माझी काही अडचण नाही. महाडिक यांच्या या सूचनेवर मुश्रीफ यांनी आम्ही पी. एन. यांना भेटू शकत नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे ही चर्चा तिथेच थांबली. या बैठकीनंतर मुश्रीफ यांची शासकीय विश्रामधामवर पत्रकारांनी भेट घेतली. यावेळी मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादीकडून दिलेल्या प्रस्तावास महाडिक यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही ‘गोकुळ’च्या निवडणुकीसंदर्भातील काय असेल तो निर्णय बुधवारी माघारीचा शेवटच्या दिवशी घेऊ, घाटगे यांना उमेदवारी देऊ नका, असे मी कधीही म्हटलेले नाही. तसे वृत्तपत्रवालेच छापत आहेत, माझा प्रस्ताव काय आहे, हे पत्रकारांना काय माहीत आहे?
दरम्यान, या बैठकीला विक्रमसिंह घाटगे उपस्थित असल्याचे समजले परंतु मुश्रीफ यांनी विक्रमसिंह घाटगे या बैठकीला उपस्थित नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्यासमवेत बैठक झाली. बैठकीत निर्णय झाला नाही; पण अंतिम निर्णय बुधवारीच घेतला जाईल.
- आमदार हसन मुश्रीफ



स्वीकृत संचालकाच्या आश्वासनानंतर माघार : हाळवणकर
इचलकरंजी : ‘गोकुळ’मध्ये भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार सुरेश हाळवणकर व ‘गोकुळ’चे पॅनेल प्रमुख आमदार महादेवराव महाडिक यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन भाजपला निवडणुकीनंतर एका जागी स्वीकृत संचालक करून घेण्याचे आश्वासन आमदार महाडिक यांनी दिल्याने भाजपने अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन हाळवणकर यांनी केले.

Web Title: Mahadik denied to boycott Ambarrica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.