महादेवराव महाडिक यांनी गाठली दिल्ली

By Admin | Updated: November 19, 2015 01:19 IST2015-11-19T01:17:17+5:302015-11-19T01:19:01+5:30

विधान परिषद निवडणूक : सोनिया गांधीची भेट घेणार

Mahadevrao Mahadik reached Delhi | महादेवराव महाडिक यांनी गाठली दिल्ली

महादेवराव महाडिक यांनी गाठली दिल्ली

कोल्हापूर : विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, यासाठी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठल्याचे समजते. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हेही असल्याचे समजते. आपण विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीवर आपलाच हक्क असल्याचे ते श्रीमती गांधी यांना भेटून सांगणार आहेत.
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसअंतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील, प्रकाश आवाडे व पी. एन. पाटील यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. मंगळवारी या चौघांच्या मुलाखती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबई येथे घेतल्या. चौघांनीही उमेदवारीवर दावा केल्याने हा पेच प्रदेश पातळीवर सुटणार नसल्याने मुलाखतीचा अहवाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठविला जाणार आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील व आमदार महाडिक यांच्यातच उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवर उमेदवारीचा गुंता सुटणार नसल्याने आमदार महादेवराव महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमवेत दिल्ली गाठल्याची चर्चा बुधवारी दिवसभर कोल्हापुरात होती. खात्री करून घेण्यासाठी आमदार महाडिक यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही.
उमेदवारी कोणाला यावरून सतेज पाटील व आमदार महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी दोघांमध्ये टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्याची ठिणगी मंगळवारी मुलाखतीवेळी मुंबईत पडली आहे. आमदार महाडिक यांनी दिल्ली गाठल्याने इतर इच्छुकांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
 

आमदार महादेवराव महाडिक हे मंगळवारी मुलाखतीसाठी मुंबईत होते. ते बुधवारी कोठे होते, याबाबत आपणाला काहीच माहिती नाही.
- खासदार धनंजय महाडिक

Web Title: Mahadevrao Mahadik reached Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.