महापालिकेत होणार ‘महाभरती’
By Admin | Updated: November 28, 2014 23:44 IST2014-11-28T23:37:07+5:302014-11-28T23:44:07+5:30
नव्या आकृतिबंधास वेग : लवकरच प्रस्ताव पाठविणार; ७०० नवे कर्मचारी येणार

महापालिकेत होणार ‘महाभरती’
संतोष पाटील - कोल्हापूर -महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून गेली ४० वर्षे नवी कामगार सूची झाली नाही. शहराची लोकसंख्या चौपट झाली, विभाग व घरे तिप्पट झाली. तरी कामगारांचा आकृतिबंध १९७४ साली होता तोच आहे. मात्र आता स्थायी समितीची शिफारस व महासभेच्या मंजुरीमुळे नव्या कामगार सूचीला वेग आला आहे. प्रशासनाने प्रस्ताव पाठविल्यानंतर येत्या तीन महिन्यांत महापालिकेत तब्बल २० टक्के नोकर वाढणार असून, ७०० हून अधिक कामगारांची भरती होणार आहे.
राज्यातील ‘बेबी कॉर्पोरेशन’ म्हणून १६ एप्रिल १९७४ रोजी कोल्हापूरला लोकसंख्येचा निकष बसत नसतानाही विशेष बाब म्हणून महापालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, बावडा असे जुने पेठांचे कोल्हापूरच अस्तित्वात होते. १९९२ नंतर शहरीकरणाचा वेगाने विस्तार झाला. नगरपालिका असताना पावणेदोन लाख असणारी लोकसंख्या आता सहा लाखांचा टप्पा ओलांडत आहे. मात्र, महापालिकेत असणारी कर्मचाऱ्यांची सूची व आकृतिबंध १९७४ चा आहे. यामध्ये दर दहा वर्षांनी आवश्यक असणारा बदल केला गेला नाही.
सध्या महापालिकेत ४८०० कायम, तर ५५० रोजंदारीवरील कर्मचारी आहेत. यातील १५०० झाडू कामगार, ३१२ सफाई कामगार व ६४१ ‘पवडी’ कामगार आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल तीन हजार कर्मचारी इतर कामांसाठी वापरातील आहेत. १८०० कर्मचाऱ्यांवर ३६ विभागांचा भार आहे. यामध्ये ४२ खातेप्रमुख आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांची तांत्रिक, अतांत्रिक, लेखा व प्रशासकीय अशी विभागणी आहे. शहरात १९७४ साली ५० हजार मिळकती होत्या. आज त्या १,३६,००० आहेत. लोकसंख्याही चौपट झाली. मात्र, नोकरभरती झाली नसल्याने रोजंदारीसह ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर काम चालविले जात आहे. नागरिकांना वेळेत सुविधा देण्यासाठी नव्याने आकृतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ कोटी ६० लाखांचा भार
महापालिकेतील नोकरपगारावर सध्या आठ कोटी रुपये खर्च होतात. नव्या भरतीनंतर यामध्ये एक कोटी साठ लाखांची भर पडणार आहे. मात्र, यामुळे २० टक्के जागांचे मनुष्यबळ शहरवासीयांच्या सेवेत दाखल होईल.
राज्य शासनाने नव्या आकृतिबंधानुसार नोकरभरती सुरू केली आहे. ‘बीपीएमसी अॅक्ट’ कलम ५१ अनुसार याचा कोल्हापूरला फायदा होऊ शकतो. प्रशासनाने कायद्याच्या चाकोरीतून प्रस्ताव पाठविल्यास तीन महिन्यांत नव्या नोकरभरतीचा मार्ग खुला होणार आहे.