महासंग्रामात ‘महासंभ्रम’
By Admin | Updated: January 17, 2017 01:01 IST2017-01-17T01:01:25+5:302017-01-17T01:01:25+5:30
ॅमतदारसंघानुसार राजकारणात बदल : महत्त्वाकांक्षी कार्यक र्त्यांना प्रभावी पर्याय

महासंग्रामात ‘महासंभ्रम’
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
दिल्लीची आणि मुंबईची राजकीय गादी बदलल्याचा परिणाम गावपातळीवर कसा होऊ शकतो, याचे उत्तम प्रत्त्यंतर सध्या येत असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तेवढी राजकीय महासंभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या वीस वर्षांत कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण हे प्रामुख्याने दोन्ही काँग्रेसभोवती फिरत राहिले. त्यातही राष्ट्रवादी बऱ्यापैकी एकसंघ जाणवत होती. मात्र, ‘महाडिक फॅक्टर’मुळे प्रत्येकवेळी काही तरी वेगळेच चित्र निर्माण व्हायचे. गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने जिल्ह्यात बस्तान बसविले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी शिवसेनेच्या सहा उमेदवारांनी आमदारकी मिळवली.
महाडिक यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढत त्यांचा पराभव करत सतेज पाटील यांनी त्यांच्या स्थानाला धक्का लावला; परंतु महाडिकांनी जिल्ह्यातील बदललेल्या परिस्थितीचा अचूक लाभ उठवत ‘ताराराणी आघाडी’चे पुनरूज्जीवन केले. स्वत: अपक्ष, मुलगा अमल भाजपचे आमदार, दुसरे चिरंजीव स्वरूप ‘ताराराणी आघाडी’चे अध्यक्ष आणि पुतण्या धनंजय राष्ट्रवादीचे खासदार असे सर्वपक्षीय बहुरंगी चित्र महाडिक यांनी राजकारणात काढून ठेवले आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांना महापालिकेची थोडक्यात हुकलेली सत्ता जिल्हा परिषदेत मिळवायची आहे. त्यासाठी ते ‘भाजता’चा प्रयोग राबवत आहेत. परंतु या सगळ्याचा परिणाम म्हणजे सर्व तालुक्यांतील महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांना प्रभावी पर्याय मिळाले आहेत. या सगळ्यामुळे ‘प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका’ असं चित्र मात्र निर्माण झालं आहे. भाजपसोबत जिल्ह्यात असणारा जनसुराज्य पुलाची शिरोली येथे महाडिक यांच्या सुनेच्याविरोधात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसोबत राहण्याची शक्यता आहे. काही तालुक्यांतील एका मतदारसंघात दोन्ही काँग्रेस एकत्र तर
दुसरीकडे मैत्रीपूर्ण लढताना
दिसणार आहे. काही
ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप
तर शाहूवाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. सत्तेत असणारा राजू शेट्टी यांचा ‘स्वाभिमानी पक्ष’ काही ठिकाणी भाजपच्या विरोधात शड्डू ठोकताना दिसणार आहे. त्यामुळे एक मतदारसंघ सोडल्यानंतर दुसऱ्या मतदारसंघातील सभेत बोलताना आपल्या व्यासपीठावर नेमके कोण आहेत हे बघूनच नेत्यांना भाषणाला सुरुवात करावी लागणार आहे.
प्रत्येकाला हवे नेतृत्व : भविष्यातील जोडण्या !
ंजिल्हा बँक, गोकुळ, साखर कारखाना आणि पुढची विधानसभा तसेच आगामी विधान परिषद असे सर्व संदर्भ डोळ्यांसमोर ठेवून जो-तो जोडणी लावायच्या प्रयत्नात आहे. चंद्रकांतदादांना भाजपप्रणित सत्ता जिल्हा परिषदेत आणायची आहे. कोरे, महाडिक यांना त्यांचे जिल्ह्यात राजकारण मजबूत करायचे आहे, महाडिकांना तर हुकलेली जि. प. अध्यक्षांची ‘लाल दिव्या’ची गाडी घरी आणायची आहे, सतेज पाटील यांना जिल्ह्याचे नेतृत्व हवे आहे, पुढची विधान परिषदेची जोडणीही घालायची आहे, शिवसेनेच्या पाच आमदारांना गणित साधायचं आहे, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी सत्तेत असतानाही जमलं तर भाजपला दणका द्यायचाय, मुश्रीफ यांना मतदारसंघ सेफ करायचाय, संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांना लोकसभा खुणावतेय, असे ज्याच्या-त्याच्या इंटरेस्टमुळे हा महासंभ्रम निकालापर्यंत कायमच राहणार आहे.
महाडिकांच्या जाहिरातीत विनय कोरेंचा फोटो
राजकारण कसं बदलत जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाची जाहिरात होय. ज्या विनय कोरे यांनी महाडिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारी जिल्ह्यात पहिल्यांदा जाहीर विरोध केला होता त्याच महाडिक यांच्या पूर्ण पान जाहिरातीत नेत्यांच्या यादीत विनय कोरे यांचा फोटो होता. त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.