भिंत बांधू म्हणणारे तर सोपी उत्तरे देणारे जादूगारच एन. डी. सरांचा किस्सा व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:47+5:302021-07-30T04:25:47+5:30
कोल्हापूर : महापूर आला म्हणून सध्या नदीकाठी भिंत बांधण्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र, अशी सोपी उत्तर कोण शोधते ...

भिंत बांधू म्हणणारे तर सोपी उत्तरे देणारे जादूगारच एन. डी. सरांचा किस्सा व्हायरल
कोल्हापूर : महापूर आला म्हणून सध्या नदीकाठी भिंत बांधण्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र, अशी सोपी उत्तर कोण शोधते आणि अशा सोप्या उत्तराने खरंच जनतेचं भलं होत का, याबद्दलचा ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितलेला एक किस्सा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी गुरुवारी फेसबुकवर शेअर केला आहे.
ते म्हणतात, पूर येऊ नये म्हणून नदीकाठी मोठ्या भिंती बांधण्याच्या कल्पनेची सोशल मीडियात खिल्लीही उडवली जात आहे. कोणत्याही कठीण प्रश्नावर सोपी उत्तरे शोधण्याकडे अनेकांचा कल असतो व फार विचार न करणाऱ्या समूहवर्गाला ती उत्तरे खूप भावतात. त्यावर राजकारणही उभे राहते. प्रा. पाटील यांना एकदा भेटल्यावर त्यांनी गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली. एक माणूस पोलीस आयुक्तांकडे गेला व संरक्षणाची मागणी केली. मी केलेले संशोधन प्रत्यक्षात येऊ नये, म्हणून रेल्वे कंपन्या माझा खून करण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनी विचारले की संशोधन कोणते आहे? तो सांगायला तयारच होईना. शेवटी सर्वांना बाहेर काढल्यावर तो आयुक्तांना म्हणाला, ‘मी अशी रेल्वे शोधली आहे की, ज्या रेल्वेला कोळसा किंवा वीज लागत नाही. ती आपोआप चालते’. ते ऐकून पोलीस आयुक्तही थक्क झाले ‘म्हणजे कशी?’
तो माणूस म्हणाला, ‘रेल्वे रुळावर उभी करायची. एक मोठा लोहचुंबक तिथून अर्ध्या किलोमीटरवर रुळावर ठेवायचा व रेल्वेसमोर मोठा लाकडाचा ठोकळा ठेवायचा. रेल्वे सुरू करायची असेल तेव्हा ठोकळा बाजूला काढला की लोहचुंबक रेल्वेला आपल्याकडे ओढून घेईल.’ पोलीस आयुक्त म्हणाले, ‘पण रेल्वे पुढे कशी जाईल?’ तो म्हणाला, ‘रेल्वे त्या लोहचुंबकाला इतक्या जोरात धडक मारेल की पुन्हा लोहचुंबक पुढील अर्धा किलोमीटरवर ढकलले जाईल व परत रेल्वेला आपल्याकडे खेचून घेईल व रेल्वे परत धडक मारून पुढे जाईल. त्यामुळे रेल्वेला कोळसा किंवा विजेची अजिबात गरजच उरणार नाही.’