कष्ट, परोपकाराच्या बळावर माधवराव घाटगे यांची उद्योगभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:41+5:302021-08-21T04:29:41+5:30
कोल्हापूर : कष्ट, चिकाटीबरोबरच परोपकारी स्वभावाच्या जोरावर माधवराव घाटगे हे आयुष्यात यशस्वी झाले. त्यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. ...

कष्ट, परोपकाराच्या बळावर माधवराव घाटगे यांची उद्योगभरारी
कोल्हापूर : कष्ट, चिकाटीबरोबरच परोपकारी स्वभावाच्या जोरावर माधवराव घाटगे हे आयुष्यात यशस्वी झाले. त्यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. सामाजिक क्षेत्रातील घाटगे कुटुंबीयांच्या योगदानामुळे त्यांच्या उद्योगविश्वाला एक वेगळे महत्त्व आहे, असे प्रतिपादन घोडावत ग्रुपचे संस्थापक संजय घोडावत यांनी शुक्रवारी येथे केले.
येथील रोटरी समाजसेवा केंद्रात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दुगाडे, तर सेक्रेटरी जनरल प्रदीप मांजरेकर उपस्थित होते. श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. घाटगे आणि त्यांच्या वडिलांनी मोठ्या कष्टातून उद्योगाची उभारणी केली. त्यांच्याप्रमाणे उद्योग क्षेत्रातील माझा प्रवास खडतर होता. सकारात्मक राहून विविध अडचणींवर मात करून आम्ही यशस्वी झालो. उद्योग, व्यवसायातील यशासाठी सकारात्मकता, ध्येय बाळगून मेहनत करणे आवश्यक असल्याचे उद्योगपती घोडावत यांनी सांगितले. दृढ निश्चय, कष्टासह वडील, भाऊ यांच्या पाठबळावर उद्योगविश्व उभारले. दूध व्यवसाय, साखर उद्योग सांभाळत महापूर, कोरोनाच्या संकटात समाजाला मदतीचा हात दिला. निरपेक्ष भावनेने समाजकार्य केल्याने मला काही कमी पडले नाही. उद्योजक, व्यावसायिकांनी आपल्या आर्थिक स्थितीनुसार गरजूंना मदत करावी. ‘सॅटर्डे क्लब’चा सन्मान मला बळ देणारा असल्याचे घाटगे यांनी सांगितले. या कार्यक्रमात पुरस्कार निवड समितीचे परीक्षक विद्यानंद बेडेकर, श्रीकांत पोतनीस, अतुल पाटील, शांताराम सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे हर्षवर्धन भुर्के, प्रदीप मांजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी साधना घाटगे, ट्रस्टच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख विशाल मंडलिक, अध्यक्ष महेश पाटील, नीलेश पाटील, अश्विनी हंजे, मधुजा मिरजे, दीपा देशपांडे, पूनम शहा, पिराजी पाटील, योगेश देशपांडे, आदी उपस्थित होते. संकल्प मेहता, कुलदीप कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
कोल्हापूरच्या विकासात योगदान द्यावे
क्षमता असूनही निव्वळ पायाभूत सुविधा भक्कम नसल्याने कोल्हापूर मागे पडत आहे. कोल्हापूरच्या विकासातील अडथळे दूर करण्याबाबत ‘एसजीआय’ एक फोरम उभारत आहे. त्यात सहभागी होऊन उद्योजक, व्यावसायिकांनी कोल्हापूरच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन उद्योगपती घोडावत यांनी केले.