मदनभाऊंचा जीव सांगलीतच जास्त गुंतला
By Admin | Updated: October 18, 2015 23:31 IST2015-10-18T22:56:46+5:302015-10-18T23:31:09+5:30
पृथ्वीराज चव्हाण : सांगलीत शोकसभेला नेते, कार्यकर्त्यांची अलोट गर्दी; मान्यवरांकडून अभिवादन

मदनभाऊंचा जीव सांगलीतच जास्त गुंतला
सांगली : मदन पाटील यांनी राज्यस्तरावरील अनेक पदे भोगतानाच खासदारकीच्या माध्यमातून दिल्लीतही काम केले. मात्र त्यांचा जीव सांगलीतच गुंतला होता. आपल्या शहराबद्दल, जिल्ह्याबद्दल एवढे प्रेम असणारा माणूस पाहिला नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथील शोकसभेत व्यक्त केले.
सांगलीत वसंतदादांच्या स्मारकाशेजारीच शुक्रवारी मदन पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याठिकाणी रविवारी सकाळी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित शोकसभेत अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मदनभाऊंची प्रकृती ठीक नसल्याचे समजले होते. मात्र ते एवढ्या लवकर आमची साथ सोडून जातील, असे वाटले नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यातही भाऊंना मानणारे लोक मोठ्या संख्येने होते. सहा अपक्ष आमदारांनी काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला, त्यावेळी या आमदारांमध्ये मदनभाऊसुद्धा होते. राज्यातील अन्य ठिकाणचेही आमदार होते. ज्यावेळी या सहापैकी एकाला मंत्रीपद देण्याचा विषय पुढे आला, तेव्हा कोणतेही मतभेद न होता सर्वांनी एकमताने मदनभाऊंचे नाव पुढे केले होते. यावरून जिल्ह्याबाहेरही त्यांच्याबद्दल कितपत आदर होता, हे दिसून येते. त्यांनी विधानसभेत, मंत्रिमंडळात तसेच दिल्लीतही काम केले, पण ते सांगलीतच जास्त रमत होते. विधानसभेतील पराभवाने ते ज्यावेळी खचले होते, त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी मी व माणिकराव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. काम करण्यासाठी एखादे पद असावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यावेळी महामंडळाचे अध्यक्षपद आम्ही त्यांना दिले. पद दिल्यानंतर महापालिका व अन्य निवडणुकांमध्ये त्यांनी या पदानंतरचे सकारात्मक परिणाम आम्हाला दाखवून दिले होते.
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख म्हणाले की, ध्येयवादी, लढवय्या, कणखर आणि तितकाच वादळी व्यक्तिमत्त्वाचा हा नेता होता. वसंतदादांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. वसंतदादांच्या काळात या जिल्ह्याचा जो लौकिक होता, तो पुन्हा तसाच ठेवायचा असेल, तर पश्चिम महाराष्ट्रातील तसेच राज्यातील नेत्यांनी सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांना, भाऊंच्या समर्थकांना बळ देणे गरजेचे आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राजकारण असो की समाजकारण, प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका मदन पाटील यांनी स्वीकारली होती. सहकारी संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. गोरगरिबांचा कैवारी त्यांच्यारूपाने निघून गेला.
माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले की, राजकीय प्रसंगात मदनभाऊंनी आम्हाला अनेकदा मदत केली. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सांगलीतील या नेत्याचा मोठा आधार होता. त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण कार्यकर्त्यांचाही आधार निघून गेला आहे.
प्रकाश आवाडे म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या योजना त्यांनी राबविल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व वादळी होते. एका दिलदार मित्राला आम्ही मुकलो आहोत.
आ. आनंदराव पाटील म्हणाले की, भाऊंच्या विरोधात काम करण्याचाही प्रसंग आमच्यावर आला. मात्र त्यांनी कधी राजकीय शत्रुत्व वैयक्तिक पातळीवर आणले नाही.
माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले की, राजकारणाची एक वेगळी शैली मदनभाऊंकडे होती. कार्यकर्त्यांचा मोठा संच असणारा हा नेता विरोधात असला की लढायलाही बरे वाटायचे. ताकदीचा नेताच आमच्यातून निघून गेल्याने मोठे राजकीय नुकसान झाले आहे.
रमेश शेंडगे, दिगंबर जाधव, किशोर जामदार, किरण माने, सी. बी. पाटील, विनायक शेटे, यशवंत हाप्पे, शिवाजी डोंगरे, धनपाल खोत, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार आदींनीही भावना मांडल्या.
यावेळी आ. पतंगराव कदम, आ. शिवाजीराव नाईक, महापौर विवेक कांबळे, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, नानासाहेब महाडिक, मनोज शिंदे, पी. एन. पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रक्षाविसर्जन : कन्या, जावई यांच्याहस्ते विधी
मदन पाटील यांचे जावई सत्यजित होळकर, कन्या सोनिया, मोनिका यांच्याहस्ते विधी पार पाडण्यात आला.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या शोकसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. मदन पाटील यांच्या निधनाने एक खंबीर नेतृत्व काँग्रेसने गमावले. पाटील यांच्या कुटुंबियांच्या दु:खात गांधी परिवार सहभागी आहे, असे या शोकसंदेशात म्हटले आहे.
हाप्पे यांनी जागविल्या आठवणी
वसंतदादांचे सहकारी यशवंत हाप्पे यांनी यावेळी वसंतदादा व मदनभाऊंच्या आठवणी जागविल्या. कार्यकर्ते आणि त्यांच्या कन्यांवर असलेल्या मदनभाऊंच्या प्रेमाची उदाहरणेही त्यांनी दिली. या आठवणी ते मांडत असतानाच सोनिया पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्तेही रडत होते.