यंत्रमागाला २ रुपये ६६ पैसे वीजदर
By Admin | Updated: November 19, 2015 01:12 IST2015-11-19T01:01:51+5:302015-11-19T01:12:02+5:30
हाळवणकर यांची माहिती : ऊर्जामंत्र्यांची तत्त्वत: मान्यता; यंत्रमाग वीजदर निर्णयामधील त्रुटी दूर होणार

यंत्रमागाला २ रुपये ६६ पैसे वीजदर
इचलकरंजी : सात नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये दोन रुपये ६६ पैसे दराने यंत्रमागाला वीज देण्याचा निर्णय झाला. मात्र, इंधन अधिभारावरील सवलतीचा उल्लेख नसल्यामुळे या शासन निर्णयात त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्याची मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी मंत्रिमहोदयांनी शासन निर्णयात दुरुस्ती करून सवलतीचा लाभ देण्याचे तत्त्वत: मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करताना आ. सुरेश हाळवणकर यांनी दि. ३१ आॅक्टोबर २०१५च्या परिपत्रकान्वये महावितरण कंपनीने यंत्रमाग वीज ग्राहकांना आॅक्टोबर, नोव्हेबर आणि डिसेंबर २०१५ या तीन महिन्यांसाठी प्रतियुनिट १०८.६० पैसे ते १३७.६० पैसे इतका इंधन समायोजन आकार लागू केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंत्रमागास दोन रुपये ६६ पैसे इतका सवलतीचा वीजदर लागू करूनसुद्धा इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे एकूण वीजदरात वाढ दिसत आहे. त्यामुळे टॅरिफमध्ये यंत्रमाग वीजदरास ५० टक्के सवलत असल्यामुळे इंधन समायोजन आकारामध्येसुद्धा ५० टक्के सवलत देणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर दि. ५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयातील अट क्र. ४ मध्ये इंधन समायोजन आकारात अनुदान देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे यंत्रमाग वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारातसुद्धा सवलत मिळत होती, परंतु दि. ७ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयामध्ये इंधन समायोजन आकारात देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उल्लेख नाही. त्यामुळे इंधन समायोजन आकारातील लाभ ग्राहकांना मिळणार नाही.
परिणामी वाढीव वीजदर यंत्रमाग ग्राहकांना भरावा लागणार आहे. त्यामुळे यामधील त्रुटी दूर करून इंधन समायोजन आकारामध्ये सवलतीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. ती मंत्रिमहोदयांनी तत्त्वत: मान्य करून शासन निर्णय दुरुस्त करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
दिलासा : इंधन समायोजन आकारात अनुदान
७ नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयामध्ये इंधन समायोजन आकारात देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उल्लेख नसल्याने इंधन समायोजन आकारातील लाभ ग्राहकांना मिळत नाही. हा लाभ देण्यासाठी यातील त्रुटी दूर होणार आहेत.