म. गांधींजींच्या विचारांची आजही गरज : संकेत मुनोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:58+5:302021-02-14T04:22:58+5:30
कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि ...

म. गांधींजींच्या विचारांची आजही गरज : संकेत मुनोत
कुरुंदवाड : भारताला धर्मनिरपेक्ष, एकसंघ, आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामर्थ्यशाली बनविण्यासाठी गांधी आचार-विचारांची गरज आहे. भारतातील हिंदू कट्टरवादी आणि पाकिस्तानातील मुस्लीम कट्टरवाद्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत गांधींचे विचार अडसर ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा द्वेष व प्राणघातक हल्ले होत आहेत. गांधींचा चरखा हे अहिंसेचे प्रतीक असून, रचनात्मक कार्याचा भाग आहे. जात, धर्म, पंथ, प्रदेश, भेद यासारख्या विभागणीला आव्हान देण्याचे काम आजच्या काळात गांधींची प्रेरणा व समग्र कार्यच करू शकतो, असे प्रतिपादन गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी केले.
येथील कृष्णा-पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार-प्रचार समितीच्या वतीने सर्वोदय दिनानिमित्त गांधी विचार कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी संजीव साने होते.
सकाळी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मुनोत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोलाचे संस्थापक ललित बाबर, संयोजन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन दानवाडे, लेखिका नीलम माणगावे, राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांची भाषणे झाली. दुसऱ्या सत्रात शाहीर बाळासाहेब नाईक यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, सुंदर देसाई, प्राचार्य व्ही.डी. माने, सुंदर देसाई, गीता गुरव, मेघना शेटे, अरुण चव्हाण, एस.एस. सावंत, हसन देसाई, आबा कांबळे, वैभव उगळे, जयपाल बलवान, प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. राजू निर्मळे, नारायण कौलापुरे आदींची उपस्थिती होती. महेश घोटणे यांनी आभार मानले.
फोटो - १३०२२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील कृष्णा- पंचगंगा घाटावर महात्मा गांधी विचार- प्रचार समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात गांधी अभ्यासक संकेत मुनोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, आबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.