हुपरीतील टोळीकडून आलिशान कार जप्त
By Admin | Updated: July 10, 2016 01:41 IST2016-07-10T01:28:04+5:302016-07-10T01:41:55+5:30
तीन गाड्या : आणखी कोणाकोणाला लुटल्याची चौकशी सुरू

हुपरीतील टोळीकडून आलिशान कार जप्त
कोल्हापूर : पुणे येथील शिवाजीनगर परिसरातील उद्योजक महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहायक फौजदारासह अन्य आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन आलिशान कार शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या. या दरोडेखोर टोळीने आणखी कोणाकोणाला लुटले आहे, यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी दिनकर मोहिते यांनी सांगितले.
हुपरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार संजय लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी, त्यांचे साथीदार फैयाज शेख, जितेंद्रकुमार शर्मा, वसंत पाटील, आशिष मायगोंडा, सदानंद कांबळे यांनी पुण्यातील जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला व तिच्या मानलेल्या भावाला खाकी वर्दीचा धाक दाखवून पाच कोटींची खंडणी मागत ३१ लाख ५० हजार रुपये लुटले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या सर्वांना अटक केली. संजय लोंढे याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला उद्या, सोमवारी कागल येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अन्य संशयित आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते चौकशी करीत आहेत. संजय लोंढे, वसंत पाटील व आशिष मायगोंडा यांच्या तीन आलिशान कार जप्त केल्या.
लुटलेल्या पैशांसंबंधी चौकशी केली असता त्यांनी ते एकमेकांना वाटून घेतल्याचे सांगितले. या सर्वांच्या घरांची पोलिसांनी
झडती घेतली आहे. त्यांच्या बँक खात्यांची व मालमत्तेचीही पोलिस माहिती घेत आहेत. दिवसभर
या संशयितांकडे पोलिस मुख्यालयात चौकशी सुरू असते. त्यानंतर
त्यांची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली जाते. (प्रतिनिधी)
डायरीची चौकशी
सहायक फौजदार संजय लोंढे व कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी यांनी इंदोरला चोरीच्या तपासासाठी जात असल्याची नोंद हुपरी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड डायरीमध्ये केली आहे. जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर तपासाला जाण्यासाठी पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक ते पोलिस अधीक्षकांची मंजुरी घ्यावी लागते; परंतु हे दोघे मंजुरी न घेताच इंदोरला निघून गेले. त्यांची नोंद घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस निरीक्षकाकडे चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकारी मोहिते यांनी सांगितले.
असे घेतले वाटून पैसे :
सहायक फौजदार संजय लोंढे : ६ लाख
कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी : ३ लाख
वसंत धनाजीराव पाटील : १० लाख
फैयाज बादशहा शेख : ४ लाख ३० हजार
आशिष बाळासो मायगोंडा : ३ लाख ५० हजार
जितेंद्रकुमार शर्मा : २ लाख
सदानंद कांबळे : १ लाख ५० हजार
चैनी, एकत्रित खर्च : १ लाख २० हजार