जिल्ह्यात मतदार कमी, बंदोबस्त जास्त

By Admin | Updated: December 28, 2015 01:13 IST2015-12-28T01:12:39+5:302015-12-28T01:13:39+5:30

विधान परिषद निवडणूक : पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगडला १०० टक्के मतदान गडहिंग्लजमध्ये गटाने मतदान

Low voters in the district, more settlement | जिल्ह्यात मतदार कमी, बंदोबस्त जास्त

जिल्ह्यात मतदार कमी, बंदोबस्त जास्त

गडहिंग्लज : एकूण २५ मतदारांनी दोन गटाने मतदान केले. येथील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती अशा २५ मतदारांसाठी पालिकेच्या शाहू सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली.
सकाळी नऊच्या सुमारास जनता दलाच्या नगरसेवकांसह जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर आणि जिल्हा परिषद सदस्य अप्पी पाटील, आदी ११ जणांनी एकत्रित येऊन मतदान केले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक, चार जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या सभापती अनुसया सुतार, आदी १४ जणांनी मतदान केले.
राष्ट्रवादीच्या मतदारांसोबत मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी तसेच काँगे्रसचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता, तर सकाळी जनता दलाचे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे काही काळ मतदान केंद्र परिसरात ठाण मांडून होते.
पन्हाळात शंभर टक्के मतदान
पन्हाळा : पन्हाळा विधान परिषद मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरणात दुपारी दोन वाजेपर्यंत २६ पैकी २६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
येथील नगरपरिषद सभागृहात विधान परिषदेसाठी मतदान केंद्र होते. सकाळी आठ वाजल्यापासून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजय जाधव आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते डोक्यावर ‘सतेज’ अशा चिन्हाच्या टोप्या घालून बसले होते. याच दरम्यान, अमल महाडिक, अरुण नरके, विकी महाडिक व महाडिक समर्थक मतदान केंद्रावर आले होते.
जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता पाटील, सुजाता पाटील, मोकाशी गटाच्या सहा नगरसेवकांनी दुपारी एक वाजता मतदान केले. उरलेले सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य पिवळ फेटे बांधून एकदम १७ जण आले, तर जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री पाटील दीड वाजण्याच्या दरम्यान आल्या. सर्व मतदान प्रक्रिया दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण होऊन शंभर टक्के मतदान झाले. माजी आमदार विनय कोरे मतदान केंद्रावर दीड वाजता आले. मतदान केंद्रावर पोलिसांच्या विशेष पथकासह ३५ पोलीस व ४ अधिकारी तैनात होते.
मलकापुरात १00 टक्के मतदान
मलकापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मलकापूर केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. मलकापूर केंद्रावर सकाळी १.३0 वाजता मतदानास सुरुवात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व दोन जिल्हा परिषद सदस्यांना कऱ्हाडवरून मलकापूर येथे बंदोबस्तात आणण्यात आले. सकाळी नऊ वाजता नगरसेवक सुयोग तानवडे यांनी पहिले मतदान केले. त्यानंतर पंधरा नगरसेवक व नगरसेविका व दोन जि. प. सदस्यांनी मतदान केले. जनसुराज्यचे नगरसेवक व काँग्रेसच्या जि. प. सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्राबाहेर आमदार सत्यजित पाटील, आमदार अमल महाडिक, प्रकाश पाटील, राजू प्रभावळकर, रणवीर गायकवाड, स्वरुप महाडिक यांच्यासह शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते. तर काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड, जिल्हा बँके चे संचालक सर्जेराव पाटील, माजी सभापती सुभाषराव इनामदार, माजी उपसभापती महादेव पाटील, विष्णू पाटील, सरपंच विष्णू लाड व रंगराव खोपडे, मलकापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, आदीसह जनसुराज्य व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते केंद्राबाहेर थांबून होते.
राधानगरीत विधान परिषदेसाठी शांततेत १०० टक्के मतदान
राधानगरी : राधानगरी तालुक्याचे विधान परिषदेसाठी शांततेत १०० टक्के मतदान झाले. राधानगरी तालुक्यातील एकूण सहा मतदारांपैकी सहाही जणांनी दोन वाजण्याच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. हे मतदार एकाच गाडीतून भगव्या रंगाचे फेटे परिधान करून मतदान केंद्रावर उतरले. मतदान केंद्राजवळ दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दहा मिनिटे.. चार मते
आजरा : आजरा तालुक्यातून जि. प.चे तीन व पं. स. सभापती एक असे एकूण चौघांचे मतदान केवळ दहा मिनिटांत पार पडले. एकाच गाडीतून उमेश आपटे, विष्णुपंत केसरकर, संजीवनी गुरव व मुकुंदराव देसाई हे चौघेजण आले. भगव्या फेट्यात आलेल्या या चौघांनीही केवळ दहा मिनिटांत मतदान केले.
चंदगडला १०० टक्के मतदान
चंदगड : कोल्हापूर विधान परिषदेसाठी रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत चंदगड तालुक्यातील सहा मतदारांनी मतदान केले. दुपारी एक वाजता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. रविवारी सकाळी अकरा वाजता मतदान कक्षात जि. प.च्या महिला बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, पं. स.च्या सभापती ज्योती पवार-पाटील यांनी मतदान केले. त्यानंतर तब्बल सव्वा तासाने राजेंद्र परीट, तात्यासाहेब देसाई, महेश पाटील, सुजाता पाटील हे काँगे्रस व राष्ट्रवादीचे चार सदस्य एका गाडीतून आले व त्यांनी मतदान केले. केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार डी. एस. कांबळे यांनी काम पाहिले.
भुदरगडमध्ये १०० टक्के मतदान
गारगोटी : भुदरगडमध्ये विधानपरिषदेसाठी १०० टक्के मतदान झाले. सकाळपासून माजी आमदार सतेज पाटील यांच्या बुथवर गर्दी होती, तर आमदार महाडिक यांच्या बुथवर मात्र १२ वाजेपर्यंत भुदरगड तालुक्यातील ओळखीचे कोणीही या बुथवर नव्हते. परंतु, ‘गोकुळ’चे संचालक धैर्यशील देसाई यांनी मतदान केंद्रावरून सरळ महाडिक यांच्या मतदान बुथवर उपस्थिती दर्शविली.
१२ वाजून ३० मिनिटांनी सतेज पाटील यांचे कार्यकर्ते कोल्हापूरकडून सभापती विलासराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर, सुनीता देसाई यांना मतदान केंद्रावर घेऊन आल्यावर सतेज यांच्या नावाने टोपी घालून बसलेल्या मंडळींनी एकदम ‘बंटी साहेब की जय’ अशी घोषणाबाजी करत या तीन मतदारांना मतदान केंद्राच्या गेटपर्यंत पोहोचवले; तर १२ वाजून ४५ मिनिटांनी धैर्यशील देसाई हुतात्मा स्मारकाच्या दिशेने आपल्या गाडीतून जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, रूपाली पाटील यांना घेऊन आले. माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, शामराव देसाई, मधुकर देसाई, सत्यजित जाधव, सुरेश नाईक, तात्यासो देसाई, विजय आबिटकर, रवींद्र नागटीळ, उपसरपंच अरुण शिंदे, मिलिंद पांगिरेकर, राजू काझी, धनाजी खोत, भुजंगराव मगदूम, सुनील कोटकर, भालचंद्र कलकुटकी, अविनाश भोपळे, अमित जाधव, सचिन भुजूगडे, रत्नाकर देसाई, अजित देसाई, अल्ताफ बागवान, विद्यापीठाचे कर्मचारी, आदी पाटील यांच्या बाजूने मतदान बुथवर होते; तर महाडिक यांच्या बुथवर ओळखीच्या व्यक्ती नसल्याने भुदरगड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित नव्हते.


माझ्या विजयासाठी ज्योतिषाची गरज नाही : महाडिक
विधान परिषद निवडणुकीतील माझा विजय सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तो निश्चितच आहे, असा विश्वास भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांनी मतदानानंतर व्यक्त केला. विकासकामांत मी जरूर मागे असेन परंतु या जिल्ह्णातील एकाही माणसाला महाडिकांनी कधी त्रास दिलेला नाही व हीच माझी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. येथील उद्योग भवनातील मतदान केंद्रावर सगळ््यात अगोदर महाडिक सकाळी पावणेआठ वाजताच आले होते. दिवसभर ते थांबून होते. शेवटचे मतदान झाल्यावर पावणेचारच्या सुमारास ते माजी महापौर सुनील कदम व सत्यजित कदम यांच्यासमवेत निघून गेले. ते म्हणाले,‘यापूर्वीच्या लढतीतही जे लोक माझ्या विरोधात होते तेच या वेळेलाही विरोधात आहेत; परंतु सामान्य मतदार माझ्या बाजूने आहे. तो अत्यंत हुशार व चांगल्या वाईटाची जाण असणारा आहे. त्यामुळे मत कुणाला द्यायचे हे त्याने सूज्ञपणाने ठरविलेले आहे.

सर्वांना चकवा देत फेटे परिधान केलेले नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषदेचे सदस्य नगरपरिषदेच्या पाठीमागील रस्त्यावरून मतदान केंद्रावर दाखल झाले.
जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री पाटील या एकट्याच मतदानासाठी आल्या होत्या.
मोकाशी गटाच्या सर्वांनी मतदान करून लगेचच घर गाठले.



महाडिक समर्थक
शिवसेनेचे पाच नगरसेवक, राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक व जनसुराज्य पक्षाचे दोन नगरसेवक, शाहूवाडी विकास आघाडीचे दोन जि. प. सदस्य असे सतराजण आमदार महादेवराव महाडिक यांच्या बाजूने आले आहेत.


सतेज समर्थक
जनसुराज्य पक्षाचे चार नगरसेवक काँग्रेसचे दोन जि. प. सदस्य व एक सभापती असे मिळून सात मतदारांनी सतेज पाटील यांच्या समर्थकांत समावेश होता.

Web Title: Low voters in the district, more settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.