पावसाचा जोर कमी; मात्र नद्यांची पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:31+5:302021-06-19T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत ...

पावसाचा जोर कमी; मात्र नद्यांची पातळीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून प्रतिसेंकद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी रात्री आठ वाजता ३३.५ फुटांवर पोहोचली असून, जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी धुवाधार पाऊस झाला. दिवसभर अक्षरश: झोडपून काढल्याने एका दिवसात सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून उघडझाप सुरू राहिली. थोडा वेळ उसंत घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे जोरदार सरी कोसळत राहिल्याने पाणीच पाणी व्हायचे. दिवसभरात कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्याने सखल भागात पाणी साचले होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस कोसळत असल्याने राधानगरी धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नद्याच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
‘मृग’ नक्षत्रातच पावसाने आपला रंग दाखवल्याने जुलै, ऑगस्टमध्ये महापुराची भीती नागरिकांच्या मनात आहे.
जयंती नाला तुडुंब
कोल्हापूर शहरातील प्रमुख जयंती नाला दुथडी भरून वाहू लागला आहे. शुक्रवारी पावसाचा जोर कमी असला तरी नाला तुडुंब भरून वाहत होता.
तेरा मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक
दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील तेरा मार्ग बंद आहेत. यामध्ये चार राज्य मार्ग तर, नऊ प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
ऊस पिकांचे मोठे नुकसान
गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने जमिनीत पाणी मुरत नसल्याने ते सैरभैर झाले आहे. जिकडे वाट मिळेल तिकडे शिवारात पाणी घुसत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांध फुटी झाली आहे. त्याचबरोबर आडसाल उसाच्या लागणी कोलमडल्या आहेत. तर भात पिकात पाणी उभा राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
फोटो ओळी :
१) कोल्हापूर शहरात शुक्रवारी अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्याने पाणीच पाणी झाले होते. (फोटो-१८०६२०२१-कोल- रेन)
२) पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी परिसरात पसरले आहे. पुराच्या पाण्याचा आनंद शुक्रवारी नागरिकांनी घेतला. (फोटो-१८०६२०२१-कोल- रेन०१ व रेन०२)
(छाया- आदित्य वेल्हाळ)