कोल्हापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By Admin | Updated: February 27, 2016 01:02 IST2016-02-27T01:02:19+5:302016-02-27T01:02:19+5:30

महापालिका : पंचगंगेची पातळी कमी झाल्याचा परिणाम

Low pressure water supply to Kolhapur | कोल्हापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

कोल्हापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

कोल्हापूर : शहरात पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने शिंगणापूर येथील उपसा केंद्राकडून उपसा कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राधानगरी धरणातून पुरेसे पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती जलसंपदा विभागाला करण्यात आल्याचे महानगरपालिका सूत्रांनी सांगितले.
पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमालीची कमी झाली आहे. शहराला दैनंदिन लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी बालिंगा तसेच शिंगणापूर येथील बंधाऱ्याजवळून उपसा केला जातो; परंतु या बंधाऱ्याजवळच पाणीसाठा कमी झाला असल्याने उपसाही कमी होत आहे. त्यामुळे शहराला आवश्यक असलेला पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून शुक्रवारी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने जलसंपदा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पंचगंगा नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती केली आहे. शनिवारपर्यंत पाणी नदीपात्रात टाकले जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दुष्काळी योजना ६२१, सुरू सहाच
कोल्हापूर : जिल्ह्याचा जूनअखेरचा पाणीटंचाईचा आराखडा तयार आहे. आराखड्यात ६२१ उपाययोजनांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ सहा कामे सुरू आहेत. प्रत्यक्षात वाड्या-वस्त्यांंमध्ये पाणीटंचाई भीषण झाली असताना आराखड्यातील कामांना मंजुरी देण्याकडे जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी दिसत आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांतील लोकांना रानोमाळ भटकंती करून पाणी आणावे लागत आहे.
प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर केला जातो. कोल्हापुरात पाऊस चांगला होत असतो. त्यामुळे प्रशासन जानेवारीअखेरपर्यंत आराखडा तयार करत नाही, पण यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आॅक्टोबर ते जूनपर्यंत पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.
आराखडा दोन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे; परंतु आतापर्यंत फक्त सहा कामेच सुरू झाली आहेत. उन्हाच्या झळा वाढत असल्यामुळे विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. विंधन विहिरीचे पाणी जात आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाई गंभीर होत आहे. टंचाईग्रस्त गावांतून उपाययोजनांसाठी मागणी होत आहे पण गाव, तालुका पातळीवरील शासकीय यंत्रणा सुस्त आहे. टंचाईतील कामे अजून आराखड्यावरच आहेत.
पाच कोटींचा आराखडा...
जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यात २१९ गावे, ४०२ वाड्या-वस्त्यांसाठी ६२१ उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांची मागणी आहे. आतापर्यंत केवळ पाचगाव नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी दहा लाख, कळंबा, खडकेवाडा (ता. कागल) या गावात खासगी विंधन विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
इचलकरंजीत २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार
पाणीपुरवठा सभापती : कृष्णेच्या डोहातील पाण्याचा १५० अश्वशक्तीच्या चार पंपांद्वारे उपसा
इचलकरंजी : मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतील डोहामध्ये १५० अश्वशक्तीचे चार सबमर्सिबल पंप सोडून तातडीने पाणी उपसा करण्याबरोबरच शहराला २८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी नगरपालिकेने केली असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी दिली.
नगरपालिका सभागृहामध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शहर विकास आघाडीच्यावतीने विठ्ठल चोपडे व कॉँग्रेसकडून शशांक बावचकर यांनी पाणीटंचाईचा विषय प्रकर्षाने मांडला. यावेळी गेल्या आठवड्याभरात पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतील पाण्याच्या वस्तुस्थितीबाबतचा आढावा जलअभियंता ए. एन. जकीनकर यांनी सांगितला.
त्यानंतर सभापती झोळ म्हणाले, कृष्णा नदीपात्रामधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून, शुक्रवारी मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणीपुरवठ्याचा दुसरा पंप उघडा पडला आहे. दरम्यानच्या काळात शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धिकरण केंद्रातील जमिनीमधील पाण्याच्या टाक्या भरून ठेवण्यात आल्या आहेत. यातून नगरपालिका व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या २८ टॅँकरमार्फत आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. त्याचबरोबर कूपनलिकांवर टाईमर बसवून त्याचे नियंत्रण केले जाईल.
तसेच पंचगंगा नदीतील पाणी दूषित होणार नाही व पंचगंगा प्रवाही राहील, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसासुद्धा करता येईल का, याचाही प्रयत्न केला जाईल.
या चर्चेमध्ये बावचकर, चोपडे, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील,
गटनेते बाळासाहेब कलागते, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव, गटनेते महादेव गौड, बिस्मिल्ला मुजावर, रवी रजपुते, रणजित जाधव, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)(प्रतिनिधी)

Web Title: Low pressure water supply to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.