अनुजा नेटके यांना ‘लुई ब्रेल’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:21+5:302021-01-08T05:15:21+5:30
कोल्हापूर : येथील अनुजा नेटके यांना परतूर (जि. जालना) मधील लुई ब्रेल शिक्षण संस्थेने यंदाचा लुई ब्रेल पुरस्कार जाहीर ...

अनुजा नेटके यांना ‘लुई ब्रेल’ पुरस्कार
कोल्हापूर : येथील अनुजा नेटके यांना परतूर (जि. जालना) मधील लुई ब्रेल शिक्षण संस्थेने यंदाचा लुई ब्रेल पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण फेब्रुवारीमध्ये केले जाणार आहे.
दिव्यांग (अंध) व्यक्तींंसाठी तळमळीने कार्यरत असणाऱ्या एका व्यक्ती अथवा संस्थेला लुई ब्रेल यांच्या नावाच्या या पुरस्काराने सन्मानित केले जाते. कोल्हापुरातील अनुजा नेटके या गेल्या अनेक वर्षांपासून अंध विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी अंध-दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त आणि सकारात्मक असणाऱ्या बातम्यांचे संकलन करून त्यांचे वाचन आणि व्हॉट्स ॲपवरून प्रसारणाचा ‘दिव्यदृष्टी’ हा उपक्रम त्या राबवित आहेत. स्पर्शज्ञान या पहिल्या मराठी ब्रेल पाक्षिकाचे संपादक स्वागत थोरात यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनुजा यांनी ‘दिव्यदृष्टी’ची सुरूवात केली. त्यांचा हा उपक्रम अंध व्यक्तींसाठी उपयुक्त ठरत आहे. त्याची दखल घेऊन त्यांची ‘लुई ब्रेल’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. दुबईमध्ये झालेली ट्रायथ्लॉन आयर्नमॅन ७०.३ ही स्पर्धा औरंगाबाद येथील निकेत दलाल याने पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारा निकेत हा एकमेव भारतीय अंध खेळाडू आहे. या कामगिरीबद्दल त्यालाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती लुई ब्रेल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरराव राखुंडे यांनी दिली.
फोटो (०६०१२०२१-कोल-अनुजा नेटके (पुरस्कार)