पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये कमळ फुलले!

By Admin | Updated: May 28, 2015 01:00 IST2015-05-28T00:42:54+5:302015-05-28T01:00:31+5:30

मध्यवर्ती बॅँकेतील विजयामुळे बळ : संग्राम देशमुखांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Lotus-Kelgaon constituency blooms! | पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये कमळ फुलले!

पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये कमळ फुलले!

शरद जाधव - भिलवडी -पलूस-कडेगाव मतदारसंघ तसा कॉँग्रेसचा बालेकिल्ला. येथे काही काळ संघर्षमय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने दबंगगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीचा फड बहुमताने जिंकलेले संग्रामसिंह देशमुख यांची बॅँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या विजयाने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले आहे. यामध्ये देशमुखांचे स्वकर्तृत्व हीच मोठी गोष्ट असली तरी भाजपच्या गोटामध्ये या निवडीमुळे उत्साही वातावरण आहे.
पलूस-कडेगावमधील बहुतांशी सहकारी संस्था या कॉँग्रेसच्या ताब्यात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीमध्ये पलूस तालुक्यामधून आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड यांनी डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला, तर मोहनराव कदम यांनी धोंडीराम महिंद यांचा पराभव केला. विधानसभा मतदारसंघातील दोन तालुक्यांमध्ये भाऊ आणि जावईबापूंना एकतर्फी निवडून आणून डॉ. कदम यांनी मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आपली ताकद अबाधित असल्याचे दाखवून दिले.
दुसरीकडे संस्थागटातून भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी विक्रमी मते घेऊन विजय प्राप्त केला. डॉ. पतंगराव कदम आणि देशमुख गटाचा संघर्ष सर्वश्रृत आहे. कधी अपक्ष, तर कधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून देशमुख बंधुंनी डॉ. कदम कॉँग्रेसशी नेहमीच कडवी झुंज दिली आहे. सोयीनुसार राजकीय भूमिका बदलत नेहमीच कदम यांना आव्हान दिले आहे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत राजकारणापेक्षाही दोन साखर कारखान्यांच्या माध्यमातून सहकाराचे गावागावात जाळे विणण्यात देशमुख बंधू मग्न होते. नुकतीच झालेली विधानसभेची निवडणूक पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपच्या झेंड्याखाली लढविली. कदम-देशमुखांच्या लक्षवेधी लढतीमध्ये डॉ. कदम जिंकले असले तरीही देशमुखांचा मतांचा वाढलेला टक्काही भविष्यात कदम गटासाठी धक्कादायक असाच आहे.
पलूस-कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू समजले जातात. डॉ. कदम यांच्या विरोधाचा उगम इस्लामपूरकडूनच होत असतो. मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पलूस-कडेगाव तालुक्यात संग्रामसिंह देशमुख यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली आहे. बऱ्याच वर्षांनंतर देशमुख गटास जिल्हा पातळीवर मिळालेली मोठी संधी भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आनंदाची घटना आहे. यामुळे गावागावातील भाजपचे कार्यकर्ते रिचार्ज होऊन गतीने कामाला लागले आहेत.
या निवडीच्या पार्श्वभूमीवरच कार्यकर्त्यांनी संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून आनंदोत्सव केला, तर आनंदाच्या या घडीचा फायदा घेत देशमुख बंधू मात्र कार्यकर्त्यांचे संघटन वाढवून पुढील विधानसभेसाठी मोट बांधत आहेत.


भाजपची ‘ताकद’
पलूस-कडेगाव मतदारसंघात आजवर भाजपची ताकद नगण्य होती. पतंगरावांच्या माध्यमातून कॉंग्रेसचा गट कार्यरत आहे. त्यांचे प्रबळ विरोधक अशीच देशमुखांची ओळख आहे. देशमुख राष्ट्रवादीत गेले अन् राष्ट्रवादीची ताकद वाढली. आता ते भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपचीही ताकद अचानक वाढली आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व लाड गटापुरते उरले आहे.

Web Title: Lotus-Kelgaon constituency blooms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.