नृसिंहवाडीत कन्यागत सोहळ्याची जोरदार तयारी
By Admin | Updated: June 30, 2016 01:04 IST2016-06-30T00:48:57+5:302016-06-30T01:04:54+5:30
दत्त देव संस्थानची माहिती : चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहतील; आवश्यक सोयीसुविधा पुरविणार

नृसिंहवाडीत कन्यागत सोहळ्याची जोरदार तयारी
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी कन्यागत महापर्वकाल सोहळा वर्षभर चालणार आहे. या पर्वकाल सोहळ्यासाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज असून, पर्वकाल सोहळ्याची तयारीस राज्य शासन, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पुजारी मंडळी, दत्तभक्त या सर्वांच्या सहकार्याने सुरुवात झाल्याची माहिती श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी व सचिव संजय ऊर्फ सोनू पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘श्री दत्ताची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दि. ११ (गुरुवार) व १२ (शुक्रवार) आॅगस्ट २०१६ रोजी (नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याप्रमाणे) दर बारा वर्षांनी गुरू हा ग्रह कन्या या राशीत प्रवेश करताना कन्यागत महापर्वकाल सोहळा होत आहे. श्री दत्त महाराजांचे अवतार श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांनी सुमारे ७५० वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर तब्बल १२ वर्षे तपश्चर्या करून भक्तोद्धारासाठी ‘मनोहर’ पादुकांची स्थापना केली. आजही तीन त्रिकाळ येथे धार्मिक वातावरणात पूजाअर्चा होत असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, आदी अनेक राज्यांतून असंख्य दत्तभक्त व भाविक दर्शनासाठी व संगम स्नानासाठी हजेरी लावतात. दत्तदेव संस्थानमार्फत भाविकांसाठी दोन सुसज्ज भक्तनिवास, सकाळी व रात्री मोफत महाप्रसाद व्यवस्था, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, महापूजेचे क्लोज सर्किटद्वारे थेट प्रक्षेपण, मुखदर्शन, दर्शनरांग व्यवस्था, सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका, वेदपाठशाळा, वृद्ध व अपंग व्यक्तींना दर्शन रस्ता, आदी अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत.
येथील पूर्व परंपरेनुसार कन्यागत महापर्वकालाचा कार्यक्रम होणार असून, गुरुवारी (दि. ११ आॅगस्ट) पहाटे पाच वाजता श्री दत्त मंदिरात काकड आरती व षोड्शोपचार पूजा होऊन सकाळी ८ ते ११ या वेळेत पंचामृत अभिषेक व इतर सेवा होतील. ११.३० वाजता श्रींच्या चरणकमलांवर महापूजा, नैवेद्य आरती होईल. त्यानंतर धूप, दीप होऊन प. पू. नारायण स्वामी मंदिरातून सवाद्य श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. प्रार्थना होऊन इंदुकोटी स्तोत्राने पालखीची सुरुवात होईल व श्रींच्या पालखीचे पेठभाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, ओतवाडी (संभाजीनगर) मुख्य रस्तामार्गे श्रींची पालखी ‘शुक्लतीर्थ’ येथे रात्री उशिरा पोहोचेल. शुक्रवारी (दि. १२ आॅगस्ट) सकाळी सूर्योदयावेळी ६.२० वाजता श्रींना कृष्णा नदीत विधिवत पर्वकाल स्नान होईल. त्यानंतर पूर्वपरंपरेनुसार पुण्याह वाचन, गंगापूजन, आदी धार्मिक कार्यक्रम होऊन श्रींची पालखी पुन्हा मंदिराकडे प्रस्थान करण्यासाठी निघेल. ओतवाडी (संभाजीनगर) भाग मुख्य रस्ता, मरगुबाई चौक, मधली गल्ली, गवळी कट्टा, मारुतीमंदिर, पेठभाग या मार्गे मुख्य मंदिरात रात्री उशिरापर्यंत येईल. यानंतर शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने पूरपरिस्थिती उद्भवल्यास सदर कार्यक्रमात बदल होणार असल्याची शक्यता असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.
जादा एस. टी. बसेस, पोलिस यंत्रणा, गृहरक्षक दल, व्हाईट आर्मी, महाराष्ट्र कमांडो फोर्स, स्वयंसेवक, आदींशी संपर्क सुरू असून, नदीकाठी रबरी इनरट्यूब, पोहणारे स्वयंसेवक, मुख दर्शन, दर्शन रांग व्यवस्था, घाटावर स्नान व्यवस्था, मोफत महाप्रसाद, आकर्षक विद्युत रोषणाई, पालखी मार्गावर कापडी मंडप व्यवस्था, दर्शन स्क्रीन व्यवस्था, आदी आवश्यक सोयीसुविधा पुरविणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विवेक विष्णू पुजारी, सोमनाथ वसंत काळूपुजारी, शशिकांत कल्याण बड्डपुजारी, दामोदर गोपाळ संतपुजारी, विपुल विनायक हावळे, राजेश बाळकृष्ण खोंबारे व महादेव वसंत पुजारी उपस्थित होते.